विळा लावणारा जन्म

लेखक - वैभव देशमुख

मांडवावर पसरलेली वेल

बुडापासून कापून घ्यावी विळ्यानं

सपकन

तसा

आईवडिलांच्या

मुलगा होण्याच्या प्रार्थनेला

विळा लावणारा तिचा जन्म

तिचा जन्म

तिच्या आईच्या स्तनांना

दुधाऐवजी भय फोडणारा …

 

ती जन्मली

अन् तिच्या आईच्या पाठीवर

मागच्या बाळंतपणातले

काळेनिळे वळ

पुन्हा जिवंत झाले

 

ती जन्मली

अन् कोपऱ्यात निपचित पडलेल्या

हिंस्र दुःखाने

पुन्हा डोळे उघडले …

(पूर्वप्रसिद्धी : मीडिया वॉच  दिवाळी २०१६ )