भारतीय चर्चापद्धती : 3 – आन्वीक्षिकी

लेखक - श्रीनिवास हेमाडे

‘भारतीय चर्चा पद्धती’ च्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ या संकल्पनेचे आणि पद्धतीचे स्वरूप पहिले. दुसऱ्या भागात ‘वाद’शी समांतर इतरही काही संकल्पनांचा थोडक्यात परिचय करून घेतला. भारतीय वादपद्धतीचा संबंध ‘आन्वीक्षिकी’ या विद्येशी जोडला जातो. या विद्येच्या स्वरूपात प्राचीन इहवाद आढळतो. आजच्या इहवादाशी हा इहवाद जुळणारा आहे. वादाचे प्रमेय व विषय अध्यात्मवादी न ठेवता इहवादी असले तर सामाजिक जीवनाचे प्रश्न अधिक काटेकोरपणे सुटू शकतात. त्या विद्येचा हा अल्पपरिचय.

—————————————————————————–

प्रचलित ‘आन्वीक्षिकी’चा शाब्दिक अर्थ ‘अन्वेषण-विद्या’ असा आहे. अन्वेषण म्हणजे शोध घेणे. ‘आन्वीक्षिकी’चे मूळ ‘अन्वीक्षा’मध्ये आहे. अनु = पाठीमागून जाणे, ईक्षण = पाहाणे, निरीक्षण करणे. कशाच्या पाठीमागून ? तर जे दिसते, अनुभवास येते, ज्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते त्याच्या मागून, जे प्रत्यक्ष दिसत नाही, अनुभवास येत नाही, त्याकडे जाणे = अनुमान करणे. जे अनुमानाने कळते ती ‘अनुमिती’.

 

वैदिक तत्त्वज्ञानाच्या संदर्भात परंपरेनुसार ‘अन्वीक्षा’चे दोन अर्थ आहेत : (१) प्रत्यक्ष आणि आगम (वेद) वर आधारित अनुमान; (२) प्रत्यक्ष आणि शब्दप्रमाण यांच्या साह्याने प्राप्त होणाऱ्या विषयांच्या अनुसार (पश्चात्‌) त्यांचे ईक्षण म्हणजे पर्यालोचन करणे, अर्थात्‌ ज्ञान मिळविणे. ‘आन्वीक्षिकी’ म्हणजे नेमके काय आहे ? याविषयी प्राचीन काळापासून बरीच वादग्रस्त मते मांडण्यात आली आहेत. लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते तत्त्वज्ञान ह्या संस्कृत शब्दाचा मूळ प्राचीन पर्याय ‘आन्वीक्षिकी’ हा आहे. अन्वेक्षण म्हणजे अन्वेषण करून सिद्ध केलेले सिद्धान्त सांगणारे शास्त्र ते आन्वीक्षिकी, असे ते नमूद करतात. तत्त्वज्ञानाला प्राचीन भारतीय ‘दर्शन’ असे म्हणत. म्हणून येथे दर्शन म्हणजे अन्वेक्षण करणे, म्हणून आन्वीक्षिकी = तत्त्वज्ञान, दर्शन.

 

डॉ. विद्याभूषण यांचे मत 

‘आन्वीक्षिकी’ हे अतिप्राचीन काळी वादाचे शास्त्र होते, ‘वादकला’  म्हणून या शास्त्राचा विकास अगदी प्राचीन काळापासून झाला. इ. स. पू. ६५० ते पहिले शतक या काळात ‘आन्वीक्षिकी’ शास्त्र बहरले होते. इ.स. च्या पहिल्या शतकात त्यात न्यायदर्शनातील ‘पंचावयवी वाक्य’ या संकल्पनेचा आन्वीक्षिकीत समावेश झाला; त्यानंतर त्यास ‘न्यायशास्त्र’ असे नाव मिळाले, असे डॉ. विद्याभूषण त्यांच्या ‘A History of Indian Logic’ मध्ये म्हणतात.

डॉ. विद्याभूषण यांच्या मते, आत्मा ही संकल्पना अगदी प्रथम वेद आणि उपनिषदे या संहितांच्या चर्चाविश्वात  आली, त्यावेळी ती ‘केवळ मानवी देहात वास करणारा आत्मा’ या स्वरूपाची होती. ही आत्म्याची ‘पहिली संकल्पना’ होती. आत्म्याचे ज्ञान हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट मानले गेले. त्यामुळे ‘आन्वीक्षिकी म्हणजे आत्मविद्या’ असा अर्थ तेव्हा प्रचलित झाला. नंतरच्या काळात सर्व चराचरांत, प्राणिमात्रांत असणारा जीव हाही ‘वैश्विक आत्मा’ आहे, अशी दुसरी संकल्पना वैदिक संहितांच्या चर्चाविश्वात रुजली. तिला ‘ब्रह्म’ हे नामाभिधान लाभले. या दुसऱ्या संकल्पनेत पहिली विलय पावून दुसरी अतिव्यापक बनली. या ‘ब्रह्म’चेही ज्ञान किंवा ‘ब्रह्म हेच ज्ञान’ हे तत्कालीन वैदिक जीवनाचे उद्दिष्ट बनले (हा वेदान्ताचा गाभा). या ज्ञानाला ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या असे नाव होते. त्यामुळे ‘आन्वीक्षिकी म्हणजे ब्रह्मविद्या’ असा अर्थ झाला. अशा रीतीने आत्मविद्या आणि ब्रह्मविद्या (किंवा अध्यात्मविद्या) अशा दोन विषयांचा अभ्यास म्हणजे आन्वीक्षिकी असे नवे समीकरण बनले.

महाभारत, रामायण, भागवत, पुराण, मनुस्मृती इत्यादी ग्रंथांत आन्वीक्षिकीचा उल्लेख ‘दर्शन’ असा येतो.  त्याचवेळी अन्यत्र ‘आन्वीक्षिकी’ असाही वापर काही ठिकाणी आढळतो. त्यावेळी अर्थाबाबत गोंधळ होतो. तिथे ‘दर्शन’ आणि ‘आन्वीक्षिकी’ हा शब्द तर्क, कारणसिद्धान्त म्हणून वापरला आहे की आत्मा-ब्रह्म या अर्थाने वापरला आहे,  याबाबतचा निर्णय संदर्भानुसार घ्यावा लागतो, असे डॉ. विद्याभूषण नमूद करतात.

आत्मा आणि ब्रह्म या संकल्पनांचे आन्वीक्षिकीवर आरोपण झाल्यामुळे ‘आन्वीक्षिकी म्हणजे आत्मविद्या’ असे झाले. आत्मा या ज्ञानवस्तूची चर्चा करणारी आन्वीक्षिकी ही तत्त्वज्ञान किंवा दर्शन म्हणून ओळखली गेली तर तर्क, कारणसिद्धान्त स्पष्ट करणारी आन्वीक्षिकी ही तर्कशास्त्र म्हणून विकसित झाली. इ.स.पू. ५५० च्या दरम्यान मेधातिथी गौतम या ऋषीने आन्वीक्षिकीच्या ‘तर्क’ या अंगाचा विकास केला, तरीही अनेक शतके ‘आन्वीक्षिकी म्हणजे तत्त्वज्ञान आणि तर्क’ असा उभयान्वयी अर्थ प्रसारात होता. त्यात आन्वीक्षिकी म्हणजे तत्त्वज्ञान/दर्शन हा प्रभावी होता.

‘आन्वीक्षिकी’ म्हणजे हेतूचे (कारणसिद्धान्त) विश्लेषण हा अर्थ पहिल्या शतकानंतर प्रचलित झाला. याचे मुख्य कारण विद्याभूषण देतात की, वैदिक साहित्यात सुचविल्या गेलेल्या आत्मा, ब्रह्म, पुनर्जन्म, कर्मफल इत्यादी कल्पनांना तार्किकदृष्ट्या आधार देणे नितांत आवश्यक बनले होते. तो आधार आन्वीक्षिकीतून मिळाला, त्यामुळे आन्वीक्षिकी म्हणजे तार्किकता असे समीकरण बनले आणि ‘आन्वीक्षिकी’ ला हेतुशास्त्र, हेतुविद्या, तर्कशास्त्र, तर्कविद्या, वादविद्या, प्रमाणशास्त्र, वाकोवाक्य, तक्की, विमंसि अशी विविध नावे मिळाली. आन्वीक्षिकीच्या उपयुक्ततेत बदल झाला, तसा त्याच्या नावात बदल झाला. वस्तुतः ‘आन्वीक्षिकी’ चा मूळ अर्थ  केवळ तर्क, कारणमीमांसा, विवेक, बुद्धिप्रामाण्य हाच होता, असे डॉ. विद्याभूषण स्पष्ट करतात.

आन्वीक्षिकीची गुरुपरंपरा

डॉ. विद्याभूषण यांनी आन्वीक्षिकीची गुरुपरंपरा दिली आहे. दर्शन आणि तर्कविद्या या दोन्ही अंगाने ही गुरुपरंपरा होती. त्यांतील पहिले नाव चार्वाक (इ.स.पू. ६५० अंदाजे), दुसरे सांख्यदर्शनाचे आचार्य कपिल (इ.स.पू. ६५०-५७५), दत्तात्रेय – म्हणजे आज ज्यांना दत्तगुरु म्हणतात, ज्यांची मंदिरे असतात ते दत्तसंप्रदायवाले  दत्तमहाराज (इ.स.पू. ६५० अंदाजे),  त्यानंतर आयुर्वेदाचे प्रणेते मानले जाणारे पुनर्वसू आत्रेय (इ.स.पू. ५५०), सुलभा ही विदुषी (इ.स.पू. ५५०), अष्टावक्र (इ.स.पू. ५५०), मेधातिथी गौतम (इ.स.पू. ५५०). सर्व कालमान अंदाजे. यांत दत्तात्रेय यांचा अपवाद वगळता सर्वांनी तर्कविद्या म्हणून आन्वीक्षिकीचा अवलंब केला. दत्तात्रेयांनी भक्त प्रह्लाद, अलार्क इत्यादींना ही विद्या ‘दर्शन’ म्हणून शिकविली, तर्कशास्त्र या अंगाने नाही. इतरांनी आन्वीक्षिकी तर्कविद्या म्हणून विकसित केली. गौतमाने आन्वीक्षिकीचा हेतू, कारणमीमांसा या बाजूने सर्वांगीण विकास करून वैदिक तर्कशास्त्र निर्माण केले.

कौटिल्याचे योगदान

      आचार्य कौटिल्याने मात्र ‘आन्वीक्षिकी’ला नेमका अर्थ दिला. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील ‘विद्यासमुद्देश’ या दुसऱ्या प्रकरणात ‘आन्वीक्षिकी’ची माहिती देण्यात आली आहे. तिला  ‘आन्वीक्षिकीस्थापना’ म्हटले आहे.

आन्वीक्षिकी त्रयी वार्त्ता  दण्डनीतिश्चेति विद्या:  (अर्थ. १.२.१)

अर्थ :  आन्वीक्षिकी, त्रयी, वार्त्ता आणि दण्डनीति अशा चार विद्या आहेत.

कौटिल्याच्या आधी ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीन वेद (वेदत्रयी),  वाणिज्य, शेती व उद्योगधंदे या उपजीविकेच्या साधनांचे यथार्थ ज्ञान (वार्त्ता) व दंडनीती (राजनीती – राज्याचे कायदे) या तीन क्षेत्रांतील ज्ञानालाच ज्ञान/विद्या असा दर्जा दिला गेला होता. राज्यकर्त्याने, अमात्य मंडळींनी, अभ्यासकांनी, विचारवंतानी आणि तत्त्ववेत्त्यांनी या तिन्हींवर प्रभुत्व मिळवले पाहिजे, असा जणू काही दंडक होता. या तिन्हींत ‘आन्वीक्षिकी’ ची भर घालून तिला ‘चौथी विद्या’ म्हणून ती प्रतिष्ठित केली कौटिल्याने. आता, ‘आन्वीक्षिकी’ म्हणजे काय? याचे तो उत्तर देतो :    सांख्यं योगो लोकायतं चेत्यान्वीक्षिकी (अर्थ. १.२.१०)

अर्थ :  सांख्य, योग आणि लोकायत ही तीन दर्शने म्हणजे आन्वीक्षिकी.

यांचा उपयोग काय ? तर कौटिल्य सांगतो :

धर्माधर्मौ त्रयाम्। अर्थानर्थौ वार्तायाम्। नयानयौ दण्डनीत्याम्।

बलाबले चैतासां हेतुभिरन्वीक्षमाणा लोकस्योपकरोति

व्यसनेऽभ्युदये बुद्धिमवस्थापयति ।

प्रज्ञावाक्यक्रियाविशारद्यं करोति   (अर्थ. १.२.११)

अर्थ : त्रयीच्या संदर्भात धर्म काय व अधर्म काय, वार्त्ता व्यवहाराच्या संदर्भात अर्थ काय व अनर्थ काय, दंडनीतीच्या संदर्भात योग्य धोरण कोणते व चुकीचे धोरण कोणते, तसेच या तीन विद्यांचे परस्पर बलाबल, ह्या गोष्टीची योग्य कारणे शोधून (आन्वीक्षिकी) परीक्षा करते, म्हणून ती लोकांना उपकारक होते; संकटकाळी व अभ्युदयाच्या वेळी बुद्धीला स्थैर्य प्राप्त करून देते. त्याद्वारे व्यक्तीला आचार, विचार व उच्चार यात प्रावीण्य देते. थोडक्यात,’आन्वीक्षिकी’ ही प्रज्ञा व भाषण यांच्यात उत्तमता प्रदान करते; त्यामुळे ती ‘प्रज्ञावाक्यविशारद’ आहे.

तिचे महत्त्व काय आहे ? तर कौटिल्य सांगतो :

प्रदीपः सर्वविद्यानां उपायः सर्वकर्मणाम्

आश्रयः सर्वधर्माणां शश्वद् आन्वीक्षिकी मता   (अर्थ.१.२.१२)

अर्थ : आन्वीक्षिकी ही वादविद्या ही (इतर) सर्व (तिन्ही) विद्यांचा मार्गदर्शक दिवा, सर्व कर्मांचा उपाय व सर्व धर्मांचा आधार आहे. धर्म म्हणजे शुद्ध नैतिक वर्तन, अर्थ म्हणजे उपयुक्ततावादाशी जुळणारे साध्य व काम म्हणजे प्रत्यक्ष उपभोग्यवस्तु व जीवनक्रम हा त्रिवर्ग कौटिल्यास मान्य होता.

देबीप्रसाद यांचे मत

‘आन्वीक्षिकी’च्या आशयाचे स्पष्टीकरण डॉ. देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या What is Living and What is Dead in Indian Philosophy  या ग्रंथात दिले आहे. डॉ. देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांनी ‘सांख्य, योग आणि लोकायत ही तीन दर्शने म्हणजे आन्वीक्षिकी’ या संकल्पनेची सविस्तर चर्चा केली आहे.

न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा (वेदान्त) ही वैदिक षड्दर्शने आणि बौद्ध, जैन व चार्वाक ही तीन अवैदिक दर्शने मिळून भारतीय दर्शनपरंपरा रचली जात अ्सताना दोन्हीतील केवळ सांख्य, योग आणि लोकायत या तीन दर्शनांचा समावेश कौटिल्याने ‘विद्या’ (ज्ञान) म्हणून का केला ? न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा-उत्तरमीमांसा यांची कोणतीही चर्चा करणे सोडाच, पण साधा उल्लेखही कौटिल्य करीत नाही. त्याचे कारण काय ? शिवाय बौद्ध-जैन यांनाही कौटिल्य खिजगणतीतही का धरीत नाही ? अशा अत्यंत मौलिक व मूलभूत प्रश्नांचे विश्लेषण देबीप्रसाद देतात.

देबीप्रसादांच्या मते, कौटिल्याने वैदिक-अवैदिक अशी मांडणी न करता इहवादी आणि अन्-इहवादी अशी दर्शनांची रचना केली. ती करताना कौटिल्य त्रयी मान्य करतो. पण तो त्रयी आणि आन्वीक्षिकी यांत स्पष्ट फरक करतो आणि त्यांना वेगळे करतो. त्रयीचा अर्थ कौटिल्याच्या मते विशिष्ट स्वरूपाचे वैदिक धर्मशास्त्र की ज्यात वर्णव्यवस्था व आश्रमव्यवस्था आहे. आणि आन्वीक्षिकी ही संपूर्ण स्वतंत्र विद्याशाखा आहे. ते एक वेगळे दर्शन आहे. वार्त्ता, दण्डनीति हीही स्वतंत्र ज्ञाने आहेत.

अर्थशास्त्राची रचना पाहाता कौटिल्याने आन्वीक्षिकीचा उपयोग करूनच ते रचले आहे, असे लक्षात येते. राज्यशास्त्र रचताना, राज्य करताना सांख्य, योग आणि लोकायत यांची दृष्टीच उपयोगी आहे, हे तो केवळ सूचित करीत नाही, तर त्यांचा आग्रह धरतो. म्हणून या तिघांचे ज्ञान, अध्ययन व अध्यापन ही पूर्ण वेगळी विद्याशाखा आहे. ते एक वेगळे दर्शन आहे. त्या दर्शनाच्या आधारेच मानवी जीवन रचले जावे असा कौटिल्याचा आग्रह होता.

हे कसे घडते ? सांख्य, योग आणि लोकायत यांचा अर्थ कसा लावायचा ? तर सांख्य हे तर निखळ निरीश्वरवादी अवैदिक दर्शन होते. ते कौटिल्य स्वीकारतो. मग योगचा अर्थ काय ? कौटिल्यास अपेक्षित असलेला योग याचा अर्थ पतंजलीचे योगदर्शन असा नाही, तर त्याकाळी (आज नीटसे स्वरूप मिळालेली)  न्याय-वैशेषिक मते म्हणजे योग आहे. फणिभूषण आणि कुप्पुस्वामी शास्त्री या दोन विद्वान अभ्यासकांचा दाखला देऊन देबीप्रसाद दाखवितात की  न्यायाची दार्शनिक मांडणी तर्क (विवेकशक्ती) आणि वैशेषिकाची दार्शनिक मांडणी अणुवादी होती. फणिभूषण यांच्या मते योग म्हणजे अणूंचा संयोग आणि कुप्पुस्वामींच्या मते योग म्हणजे युक्ति किंवा तर्क. त्यामुळे न्याय-वैशेषिक यांच्या तत्त्वज्ञानाला ‘योग’ म्हटले आहे. तर्कवाद आणि अणुवाद ही इहवादी मांडणी आहे. तिचा वैदिकतेशी संबंध नाही. तिसरे लोकायत हे चार्वाकांचे पर्यायी नाव, खरे तर तेच योग्य नाव. चार्वाकानी वैदिकच नाही तर बौद्ध आणि जैन यांनाही प्रखर विरोध केला. केवळ प्रत्यक्ष आणि नंतर प्रत्यक्षावर आधारित अनुमान हेच ज्ञान आणि अर्थ व काम हेच पुरुषार्थ; त्यावर आधारलेले जीवन ही निखळ इहवादी मांडणी आहे.

येथे देबीप्रसाद  हे लक्षात आणून देतात की कौटिल्याने भारतीय तत्त्वज्ञान ही संकल्पनाच मुळात बदलून टाकली होती. तो वेदांच्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित करीत नाही तर वास्तव, जग, व जीवन यांच्याविषयीचा दृष्टिकोन आध्यात्मिक, ईश्वरवादी, किंवा परलोकवादी न ठेवता तो शुद्ध तार्किक, बुद्धिप्रामाण्यवादी ठेवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका घेतो. ही अनुभववादी, प्रयोगवादी वैज्ञानिक दृष्टी होती; तीच आपणांस उपयुक्त आहे. तर्कविद्या आणि तार्किकतायुक्त दर्शनच सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे (वेद नाही !) असे सांगत   प्रदीपः सर्वविद्यानां….” असा दावा करतो.

देबीप्रसाद असे दाखवून देतात की  सांख्य, योग आणि लोकायत ही तिन्ही दर्शने मुळात अवैदिक, नास्तिक आणि इहवादी होती. या तिन्ही दर्शनांनी जगाची निर्मिती, मानवी जीवनाचा अर्थ, उद्दिष्ट, दुःख-सुख यांचे विवेचन करताना कोणत्याही परतत्त्वाचा – ईश्वर, ब्रह्म, आत्मा, कर्म – यांचा आधार न घेता केवळ मानवी जीवनाचे निरीक्षण करून आपले पूर्ण इहवादी दर्शन मांडले.

तत्कालीन राजकीय जीवनावर आन्वीक्षिकीचा खूप मोठा प्रभाव होता. रामायणाच्या उत्तरकांडात श्रीराम काही विद्वानांशी हेतुवाद करताना आढळतो. बलराम व श्रीकृष्ण हे धनुर्वेद, राजनीतिशास्त्र आणि आन्वीक्षिकी विद्या जाणत होते. राजा जनक या विद्येत कुशल होता.

लक्ष्मणशास्त्री जोशींचे मत 

कौटिल्याच्या अर्थशास्त्राबाबत  शास्त्रीजी मत व्यक्त करतात की कौटिल्याने उल्लेख केलेले लोकायत म्हणजे चार्वाक. परलोक-कल्पना, धर्मशास्त्र, उपनिषदे आणि वेदविद्या यांच्यापासून वेगळी म्हणजे पूर्ण ऐहिक विचारपद्धतीवर आधारलेली सामाजिक विद्या म्हणजे अर्थशास्त्र, हे त्यांना मान्य आहे. रोमन कायदा जसा धर्माचा भाग नव्हता तसा अर्थशास्त्रकालीन कायदा पारलौकिक धर्मविचाराचा भाग राहिला नाही, असेही ते नमूद करतात.

हे निश्चित आहे की कौटिल्याचे अर्थशास्त्र व त्याची आन्वीक्षिकीविद्या जर भारतीय जीवनव्यवहारात टिकून राहिली असती तर इथल्या समाजजीवनाचे चित्र खचितच बदलू शकले असते.  अकबर, राजे शिवाजी, टिपू सुलतान किंवा बाजीराव इत्यादी राजे मंडळी काळाच्या ओघात इतिहासपुरुष बनली इतकी ती प्रतिभावंत होतीच; पण त्यांना हा ग्रंथ उपलब्ध झाला असता तर कदाचित आणखी वेगळा इतिहास घडू शकला असता !  असे का घडू शकले नाही हा प्रश्न  आपण विद्यमान काळात  उपस्थित केला पाहिजे.

याबाबत दोन गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. एकतर अतिप्राचीन काळी ही विद्या अस्तित्वात होती. दुसरे, अतिप्राचीन काळी अशी काही चर्चाविद्या अस्तित्वात होती, हे केवळ योगायोगाने विसाव्या शतकात ज्ञात झाले ! जेव्हा ज्ञात झाले तेव्हा असेही लक्षात आले की या विद्येतील काही भाग स्वीकारला गेला, काही भाग नाकारला गेला. अनुक्रमे तिची प्रचंड स्तुति आणि निंदा करण्यात आली. जसे की ‘आन्वीक्षिकी’ तील ‘हेतू’ या साधनालाच केंद्रीभूत मानून ‘आन्वीक्षिकी’ लाच ‘तर्कशास्त्र’ असे नाव दिले गेले. हे राजकारण आत्मघातकी, चुकीचे व दिशाभूल करणारे ठरले. याबाबत  “कौटिलीय  अर्थशास्त्र” चे मराठी भाषांतरकार  पं. र. पं. कंगले म्हणतात, केवळ  “हेतुभिरन्वीक्षमाणा लोकस्योपकरोति (अर्थ. १.२.११) या शब्दांमध्ये ‘हेतुभिरन्वीक्षमाणा या शब्दप्रयोगात ‘हेतू’ चा उपयोग तर्काचा केवळ साधन म्हणून निर्देश आहे. शिवाय त्या सूत्रात व नंतरच्या श्लोकात आन्वीक्षिकीचे केलेले वर्णन सांख्य, योग यांसारख्या दर्शनांनाच लागू पाडण्यासारखे आहे, तर्कशास्त्राला नाही ! त्यामुळे ‘आन्वीक्षिकी’ चा अर्थ तर्कविद्या असा करता येणार नाही.” (अर्थात हे  स्पष्ट करतानाही  ‘लोकायत’ हे नाव घेण्याचे पं. कंगले काही ठिकाणी टाळतात. )

महत्त्व  

‘आन्वीक्षिकी’ विद्यमान इहवादी लोकशाही जीवनरीतीत उपयुक्त ठरू शकते, हा मुद्दा विद्यमान काळात जागतिक स्तरावर गंभीरतेने अभ्यासला  जात आहे, यातच तिचे महत्त्व अधोरेखित होते. उदाहरणार्थ, राष्ट्रीय सुरक्षा समिती आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद यांच्यावतीने २०१३ मध्ये “कौटिल्याचे अर्थशास्त्र : एतद्देशीय संकल्पना आणि शब्दावली यांचा विकास” या विषयावर राष्टीय चर्चासत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात कौटिल्याच्या अर्थशास्त्राची समकालीन उपयुक्तता यावर भर दिला गेला. समितीचे सल्लागार शिवशंकर मेनन, सरव्यवस्थापक डॉ. अरविंद गुप्ता आणि इतर तज्ज्ञ, अभ्यासक इत्यादींनी ज्या संकल्पनांवर भर दिला त्यात विद्यासमुद्देश आणि आन्वीक्षिकी यांचा समावेश होता.

आन्वीक्षिकीला तर्कशास्त्र म्हणून दिल्या गेलेल्या रूपाचे प्रात्यक्षिक चरक संहितेत मिळते. त्याचे स्वरूप आपण पुढील लेखात पाहू.

 

(संदर्भसूचीसाठी कृपया लेखकाशी संपर्क करावा – सं.)

 

ईमेल: shriniwas.sh@gmail.com