विनोबा

लेखक - विनोबा

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हे सगळे तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचे समाधान होते. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नांवाने खाणे सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थ असा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवतो, देवाचे नांव घेतो तेव्हा त्याला बरे वाटते. म्हणून तो एकादशीच्या दिवशीं देवाच्या नांवाने उपवास करतो. तसे पाहिलें तर एकादशीच्या उपवासानेही  त्याला पूर्ण समाधान मिळत नसते. त्याचे खरेखरे समाधान तो जेव्हा एखाद्या उपाशी माणसाला जेवू  घालतो तेव्हा होते. ईश्वराने मनुष्याला एका निराळ्याच साच्यात घालून बनविले आहे. त्याने माणसाच्या हृदयात सद्भावना ठेवली आहे. अनुकंपा ठेवली आहे. पशूंमध्ये ती नाही. म्हणून मनुष्य कोणाचे दुःख पाहू शकत नाही. एखादा प्राणी दुःखाने तळमळत पडला असेल तर जोपर्यंत त्याचे दुःखनिवारण करण्यासाठी तो काही करत नाही, तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही. जेव्हा तो आपल्या भोगाचा थोडा त्याग करतो, दुसऱ्यांचें दुःख दूर करण्यात मदत करतो तेव्हा त्याच्या चित्ताला शांति मिळते, समाधान मिळते.

विनोबा (धर्मामृत मधून साभार)