भारतीय चर्चापद्धती : वादपद्धतीशी समांतर संकल्पना आणि वादपद्धतीचे महत्त्व : 2

लेखक - श्रीनिवास हेमाडे

ह्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण ‘वाद’ ह्या संकल्पनेच्या स्वरूपाची चर्चा केली. भारतीय परंपरेत  चर्चेच्या  इतरही काही पद्धती होत्या, ज्यांना चर्चाविश्वात प्राधान्य मिळाले नाही. त्या सर्व संकल्पनांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे अंतर्गत संघर्ष झाला असावा, किंवा  त्यांच्या स्वरूपाविषयी अधिक चर्चा होऊन त्यांच्यात अधिक विकास होऊन ‘वाद’ ही संकल्पना सुनिश्चित झाली असावी. त्या संकल्पनांचा हा अल्प परिचय.

—————————————————————————–

      कोणत्याही चर्चेत, वादात प्रश्न विचारणे अपरिहार्य असते. आपण ‘प्रश्न म्हणजे काय?’ असा प्रश्न कधी विचारत नाही. बहुधा इंग्लिशमधील What means what ? किंवा मराठीत What म्हणजे काय ? असे विचारणे द्विरुक्तीचे समजले जाते, तसे काहीसे ‘प्रश्न’ या शब्दाबाबत घडत असावे. पण मला असेच काहीतरी शोधत असताना ‘प्रश्न’ चा अर्थ गवसला.

श्री. वा. शि. आपटे यांच्या शब्दकोशात प्रश्न म्हणजे ‘पृच्छ’ असा अर्थ दिला आहे. पुढे  ज्ञानकोशकार केतकरांच्या ‘प्रश्न’ या नोंदीत पुढील माहिती मिळाली – संस्कृतमध्ये ‘प्रश्न’ याचा अर्थ विचारपूस, चर्चात्मक असा आहे.  ‘प्रश्नम् एति’ या वाक्याचा अर्थ ‘तो वादात्मक मुद्यासंबंधाने निर्णयात्मक निकाल मागतो’ असा तैत्तिरीय संहितेत (२.५, ८५) आहे व तसाच इतरत्रही आहे.  यावरूनच ऐतरेय ब्राह्मणात, प्रश्न म्हणजे ‘निकाल’ किंवा  ‘ठाम मत’ अशा अर्थाने हा शब्द आढळतो. वैदिक साहित्यात इतरत्र[i]  ‘प्रश्निन्’ ‘अभिप्रश्निन्’ आणि प्रश्नविवाक हे शब्द सापडतात. ‘प्रश्निन्’ हा शव्द वादीसाठी, ‘अभिप्रश्निन्’ हा शव्द प्रतिवादीसाठी आणि ‘प्रश्नविवाक’ हा न्यायाधीशासाठी वापरात होते. ‘प्रश्निन्’ हा प्रश्नकर्ता,  ‘अभिप्रश्निन्’ हा उत्तरदाता आणि ‘प्रश्नविवाक’ हा ‘पंच’, निर्णयकर्ता- न्यायाधीश. (मर्यादायै प्रश्नविवाकम्)2. श्री. आपटे यांनीही ‘प्रश्नविवाक’ हाच अर्थ दिला आहे. तथापि ‘प्रतिप्रश्न’ हा शब्द शतपथ ब्राह्मणात ‘प्रजापती’ या नावाने परिचित असणाऱ्यासाठी आहे.  त्याचा अर्थ ‘संशयाचा निर्णय लावणारा’ म्हणजे संशय नष्ट करून, त्याचे निराकरण करून तर्कयोग्य निर्णय देणारा असा आहे. मूलतः हा शब्द मध्यस्थाला उद्देशून वापरला जाणारा पारिभाषिक शब्द आहे.

 

 वादाशी संबधित अन्य संकल्पना

(अ) ब्रह्मोद्य

       ब्रह्मोद्य म्हणजे ‘ब्रह्मविषयक चर्चा’. चर्चेच्या केंद्रस्थानी केवळ ‘ब्रह्म’ ही वस्तू आली, तेच केवळ ज्ञानाचे प्रमेय बनले तेव्हा त्या चर्चेला ‘ब्रह्मोद्य‘ असे नाव मिळाले. ब्रह्म हा शब्द यक्षवाचकही आहे. त्यामुळे ब्रह्मोद्यचर्चा हा यक्षपूजेचा एक अंश म्हणून यज्ञ संस्थेत आला असावा. यजुर्वेदात काही भाग (वाजसनेयी संहिता २३.९, ४५) आणि महाभारतातील यक्षप्रश्न (वनपर्व २९७.२६ ते ६१) हा ब्रह्मोद्य भाग म्हणून परिचित आहे. त्यातील काही श्लोक दोन्ही ठिकाणी एकसारखेच आहेत. कूट प्रश्नांना आजही यक्षप्रश्न म्हणतात.

व्युत्पत्ति

‘ब्रह्मान् वद् क्यप् – ब्रह्मान् उद्य (वचस्पि)’ – ब्रह्मोद्य या संज्ञेत ‘वद’ हा मूळ धातू असून त्याला ‘क्यप्’ प्रत्यय लागून त्यापासून ‘ब्रह्मोद्य’ हे  रूप बनते.

 ब्राह्मणग्रंथांत ‘वेदान्तविषयक गूढ (कूट) वेदान्तग्रंथि’ असा ब्रह्मोद्य या संज्ञेचा अर्थ होतो. कौषीतकी ब्राह्मणात ‘ब्रह्मवद्य’ हे रूप आढळते. तैत्तिरीय संहितेत ‘ब्रह्मवाद्य’ हा शब्द आढळतो. त्या शब्दाचाही ‘वेदान्तविषयक गूढ’ हाच अर्थ असावा.

ब्राह्मणग्रंथांनुसार अश्वमेध आणि दशरात्र यज्ञप्रसंगी वेदविषयक ज्ञानाची स्पर्धा आयोजित केली जात असे. यावेळी राजा व्याघ्रचर्म किंवा सिंहचर्म मढविलेल्या सिंहासनावर आरूढ होत असे. कारण हा यज्ञ म्हणजे अतिविशेष प्रसंग असे. राजाने कोणते तरी मोठे युद्ध जिंकलेले असे. तो विजय साजरा करण्यासाठी ज्या अनेक गोष्टी होत असत, त्यांत अशी स्पर्धा महत्त्वाची असे. त्यावेळी केवळ ब्राह्मण पंडितच त्यात भाग घेऊ शकत. त्यात ‘ब्रह्मोद्य’विषयक गहन, गूढ कुटे असत. या स्पर्धांमुळे ब्रह्मोद्य म्हणजे ‘वेदज्ञानाबद्दल अहमहमिका लागणे, धर्मशास्त्रीय समस्यांबाबत खेळकर चर्चा करणे, वेदविषयक कथाकथन करणे’ असे अर्थ केले जातात.  विशेषतः अश्वमेधयज्ञात यूपाच्या दक्षिणोत्तर होताब्रह्मा हे दोन उत्तम ब्राह्मण विद्वान एकमेकासमोर तोंड करून बसलेले आणि त्यांच्यात झालेला  प्रश्नोत्तररूप संवाद  म्हणजे ब्रह्मोद्य असे मानले जाते.

मराठी विश्वकोशातील9 नोंदीनुसार बृहदारण्यकातील उल्लेखावरून विदेहाचा राजा जनक हा मोठा तत्त्वज्ञ व धर्मवेत्ता कुरु-पांचालांच्या ब्राह्मणांनाही धर्मविद्येत मागे टाकत होता. त्यांच्या ‘अग्निहोत्र’ संबंधीच्या चुका दाखवून देत होता. त्याकाळचे ब्राह्मण ‘ब्रह्मोद्य’ हा विषय राजा जनकाकडून समजावून घेत असत.

‘ब्रह्मोद्य’ वर रेनो-सिल्बर्न, वीटझेल आणि जे.  सी. हिस्टरमन आणि जॉर्ज थॉम्पसनने  बरेच संशोधन केले आहे. त्यात थॉम्पसनचे The Brahmodya and Vedic Discourse हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

‘ब्रह्मोद्य’ चे उदाहरण म्हणून  ‘बृहद्आरण्यका’  च्या तिसऱ्या अध्यायाचा उल्लेख केला जातो. ‘ब्रह्मोद्य’ चर्चा म्हणजे भावी ब्राह्मणगुरु तयार करण्याचे प्रशिक्षण होते, असे मत थॉम्पसन याने व्यक्त केले आहे . त्याच्या मते वैदिक संस्कृती ही मुळात अज्ञातवादी होती. तिला त्याकाळात आपल्या या अज्ञातवादी भूमिकेसाठी आग्रही आणि आक्रमक शाब्दिक कसबाची  गरज होती. त्यासाठी  या ब्राह्मण- गुरुमंडळींनी नवे शिष्य घडविणे आणि त्यांना पुढील पिढीचे गुरु म्हणून विकसित करणे (त्यांनी पुन्हा नव्याने नवे शिष्य घडविणे) या कार्यासाठी ‘ब्रह्मोद्य’ ही ज्ञानदानपद्धती विकसित केली. ती आक्रमक, आक्रस्ताळी, क्रोध व्यक्त करणारी अशी एक  संवादाची रीती होती. ब्राह्मणगुरुमंडळींनी तिला हेतुतः तशी आक्रमक बनविली, असे थॉम्पसन नोंदवितो.  वैदिकांना मुख्यतः अवैदिक ब्राह्मण अथवा इतरधर्मीय विद्वानांबरोबर वाद करावयाचे होते, त्यासाठीच्या  संवादरीतीचे हे सारे  गुण(!) वैदिक गुरु मंडळींना उपयोगी पडतील असे होते.    इतरधर्मीय विद्वान हेही बहुधा वर्णाने ब्राह्मणच असत. त्यांच्याकडेही चर्चेची विविध आयुधे असत. त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी त्यांच्या आयुधांपेक्षा वरचढ आणि त्यांच्या संवादपद्धतीपेक्षा आक्रमक पद्धती आपल्याजवळ असणे वैदिकांना आवश्यक वाटले ; त्यांनी ती ‘ब्रह्मोद्य’ स्वरूपात विकसित केली.

‘ब्रह्मोद्य’ या विषयावर मराठीत काहीही लेखन माझ्या वाचनात आलेले नाही. हिंदीतदेखील “ब्रह्मोद्य–1 : दर्शन के आयाम” हा एकमेव ग्रंथ आहे. (प्रो. एस.पी. दुबे अभिनन्दन ग्रन्थ, संपादक: डॉ. रमेशचन्द्र सिन्हा, डॉ. जटाशंकर आणि डॉ. अम्बिकादत्त शर्मा, न्यू भारतीय बुक कॉरपोरेशन, दिल्ली, २०१२, पृ.५६३, रु. १५००) त्याचेच इंग्लिश भाषांतर ब्रह्मोद्य-2 : Dimensions of Philosophy (Felicitation Volume of Dr. S.P. Dubey) असे केले गेले. या संदर्भात इंग्लिशमध्ये काही भारतीय व युरोपीय संशोधकांनी अतिशय चांगले संशोधन प्रसिद्ध केले आहे. डॉ. हरिसिंग गौर सागर विद्यापीठातील संस्कृतचे विभागप्रमुख आणि राष्ट्रीय संस्कृत संस्थानचे कुलपति आचार्य राधावल्लभ त्रिपाठी यांनीही ‘वाद’ विषयावर एक मोठा ग्रंथ लिहिला आहे.

 

(ब) वाकोवाक्यम्

वाकोवाक्यम् हा वादाचाच महत्त्वाचा प्राचीन प्रकार आहे. किंबहुना तीच वादाची मूळ पद्धती असावी. डॉ. दयाकृष्ण यांनीही तिला प्राचीन भारतीयांची वादपद्धती म्हंटले आहे. ब्राह्मणग्रंथांत वैदिक संहितेमधल्या काहीं भागास ‘वाकोवाक्यम्’ हे नाव दिलेले आहे. ‘वाकोवाक्यम्’ चा मूळ अर्थ ‘दोन  विद्वान ब्राह्मण पंडितांमध्ये वाद होणे’ असा आहे.  त्या वादात जो विद्वान जिंके त्यास, कवि किंवा विप्र  ही उपाधी दिली जात असे. ‘आपले, केवळ स्वतःचे विद्वत्ता- प्रदर्शन आणि व्यक्तिगत विजय’ हेच उद्दिष्ट यात असे.

ब्राह्मणग्रंथांत एके ठिकाणी ‘ब्रह्मोद्य’ला ‘संवाद’ असेही म्हटलेले आहे. बहुतकरून सर्वच ठिकाणी ब्रह्मोद्याचा हा अर्थ होतो. तथापि पुराणात दिसून येणारा इतिहास मुख्यतः वर्णनपर असतो; त्या भागाच्या विरुद्ध असलेला संवादपर किंवा नाट्यपरस्वरूपाचा  भाग म्हणजे ‘वाकोवाक्यम्’ असा अर्थ   कार्ल फ्रीड्रिख गेल्डनर (१८५२–१९२९) हा जर्मन संस्कृततज्ज्ञ  मानतो,  असे ज्ञानकोशकार केतकर सांगतात. छांदोग्योपनिषदात (७..१.२) ‘वाकोवाक्यम्’ चा उल्लेख असून शंकराचार्यांनी त्याचा अर्थ ‘तर्कशास्त्रम्’  असा केला आहे, असे कोकजे नोंदवितात. आन्वीक्षिकी  व  ‘वाकोवाक्यम्’ हे तर्कशास्त्राचे प्राचीन नाव होते. डॉ. सतीशचंद्र  विद्याभूषण यांच्या नोंदीनुसार कण्वऋषीचा वंशज असलेला नारद नामक कुणी ऋषी या ‘वाकोवाक्यम्’चा उत्तम ज्ञाता होता.  पुराणात किंवा अन्यत्र उल्लेखिला जाणारा नारद हा खरा नारद नसून खरा नारद तो हाच ‘वाकोवाक्यम्’ ज्ञाता असावा, असेही विद्याभूषण म्हणतात.

या संदर्भात एक संवाद सांगितला जातो. तो विद्याभूषण यांचा दावा पुष्ट करतो. हा संवाद महर्षि सनत्कुमार आणि देवर्षि नारद यांच्यात झाला. एकदा ते दोघेही सत्संग करीत होते. त्यावेळी त्यांच्यात पुढील संवाद झाला. सनतकुमारांनी प्रश्न विचारले त्यावर नारदमुनीने ऋषि सनत्कुमारना उत्तर दिले की,

 

“ऋग्वेदं भगवोsध्येमि यजुर्वेदं सामवेदमाथर्वनं

चतुर्थमितिहासपुराणं पञ्चम वेदानां वेदं पित्र्यं राशिं दैवं
निधिं वाकोवाक्यमेकायनं देवविद्यां ब्रह्मविद्यां भूतविद्यां क्षत्रविद्यां नक्षत्रविद्यां सर्पदेवजनविद्यामेतदभगवोsध्येमि ||

 

अर्थ : “भगवन् ! मी ऋग्वेद अभ्यासला आहे. यजुर्वेद , सामवेद, चौथा अथर्ववेद, पाचवा इतिहास पुराण, वेदांचा वेद असणारा वेदांचे स्पष्ट ज्ञान देणारा पित्र ज्ञान म्हणजे शुश्रूषा-विज्ञान, राशि अर्थात् गणित, दैव-विद्या अर्थात् उत्पादनविज्ञान , निधि शास्त्र, वाकोवाक्यम् अर्थात् तर्कशास्त्र, एकायन अर्थात् नीति शास्त्र, भूतविद्या अर्थात् भौतिक विज्ञान, रसायनविज्ञान, प्राणिविज्ञान, देवविद्या (निरुक्त ), ब्रह्मविद्या (ब्रह्मज्ञान ), क्षत्रविद्या (धनुर्विद्या), नक्षत्रविद्या (ज्योतिष), सर्पविद्या (विषविज्ञान ), देवजनविद्या (ललितकला )  या साऱ्यांचे मी अध्ययन केले आहे.”

या ‘वाकोवाक्यम्’ च्या निर्मितीसंबंधी एक श्लोक मला सापडला, तो असा :

एवमिमे सर्वे वेदा निर्मितास्सकल्पा सरहस्या:सब्राह्मणा सोपनिषत्का:सेतिहासा: सांव्यख्याता: सपुराणा: सस्वरा :ससंस्काराः सनिरुक्ता: सानुशासना सानुमार्जना: सवाकोवाक्या

(गोपथब्राह्मण पूर्वभाग, प्रपाठक 2)

अर्थ —: कल्प, रहस्य, ब्राह्मण, उपनिषद्, इतिहास, पुराण, अनवाख्यात, स्वर, संस्कार, निरुक्त, अनुशासन, आणि वाकोवाक्य हे समस्त वेद परमेश्वरापासून निर्मित आहेत.

 

(क) ब्रह्मपरिषद

ब्रह्मपरिषद् म्हणजे ‘ब्रह्म’विषयक ब्राह्मणग्रंथातील चर्चा. ही वेदान्तप्रणीत चर्चा असते. परिषद्[ii] म्हणजे सभोवार बसणे. ‘विद्वानांची समिती’ हा वैदिक अर्थ आहे.  ब्राह्मणकाळात हा शब्द कर्मवाचक होता. म्हणजे ‘ब्रह्म’ या ज्ञानवस्तूविषयी चर्चा करणारा कोणत्याही वर्णाचा, कुळाचा तज्ज्ञ विद्वान माणसांची परिषद असा असावा.

विद्यमान काळात हा शब्द वर्णजातीवाचक बनला आहे. भारतात आणि भारताबाहेरील काही देशात ‘ब्रह्मपरिषद’ या नावाने अनेक सभा, परिषदा, मंडळे स्थापन झाली आहेत. त्यात केवळ ब्राह्मणांनाच सदस्यत्व मिळते. विद्यमान काळात दोन प्रकारचे सदस्य आहेत. एक, परिषदेस देणगी-दाने देणारे आणि दुसरे विविध कर्मकांडे, यज्ञ इत्यादी करणारे पुरोहित, पंडित इत्यादी. महाजालावर अशा मंडळ, परिषदांची एकच गर्दी आढळते3.

 

ब्रीआन ब्लॅक यांनी केलेले वादाचे चार प्रकार

लँकेस्टर विद्यापीठातील (यू.के.) तत्त्वज्ञान आणि धर्माध्ययन विभागातील प्राध्यापक ब्रीआन ब्लॅक यांनी उपनिषदांचा अभ्यास ‘तत्त्वज्ञाना’सोबतच ‘सामाजिक संवादाचे वाङ्मय’ म्हणूनही म्हणून केला आहे. त्यांच्या या अध्ययनातून वैदिक वाङ्मयाची ललित बाजू ध्यानात येते. वैदिक वाङ्मयाकडे ललितवाङ्मय’ म्हणून पाहत   भारतात उदंड लेखन झाले. किंबहुना असेच लेखन जास्त झाले, असेही म्हणता येईल. (त्याचे अनेक दुष्परिणामही झाले, ते अनेक शतके भोगावेही लागले आहेत.) तथापि पाश्चात्त्य अभ्यासकांमध्ये ‘वैदिक वाङ्मयाकडे ललित वाङ्मय’ म्हणून पाहाणे आणि त्यातही ‘सामाजिक संवादाचे वाङ्मय’ म्हणून पाहून त्यानुसार संशोधन करणे, हा प्रकार दुर्मिळ आहे. त्यातून आपल्या हाती, म्हणजे भारतीयांच्या हाती काही नवीन गोष्टी लागू शकतात.

या अभ्यासात उपनिषदातील ‘आत्मा’ या मुख्य विषयाची चर्चा करताना ब्लॅकने ‘संवाद’ किंवा ‘वादा’ चे चार प्रकार अधोरेखित केले आहेत. (१) ब्राह्मण- गुरूने ब्राह्मणशिष्याला शिकविणे (उपदेशातून व चर्चा करण्यातून ज्ञानदान या हेतूचा उदय), (२) दोन ब्राह्मणविद्वानांमधील वादविवाद (ब्रह्मोद्याचा स्पर्धात्मक पैलू), (३) ब्राह्मणगुरु आणि राजे- राज्यकर्ते ह्यांच्यातील संवाद (उपनिषदांचा राजकीय परिप्रेक्ष्य), (४) ब्राह्मण (गुरु, ऋषी) आणि स्त्रिया यांच्यातील संवाद (उपनिषदातील व्यक्तिनिष्ठता आणि लिंगभेदाची मांडणी). ब्लॅकच्या मते, ‘भारतीय परंपरेनुसार तत्त्वज्ञान ही एकांतात राहून केवळ साधना, तप इत्यादी करूनच मिळवावयाची गोष्ट आहे, असा समज आहे. पण त्यासोबतच ती  चर्चा आणि वादविवाद यांच्या माध्यमातून प्राप्त करण्यासारखी काहीएक विशिष्ट उच्च दर्जाची गोष्ट आहे, असा संदेश उपनिषदे देतात. हाच उपनिषदांचा सामाजिक संदर्भ आणि त्यांची सामाजिक उपयुक्तता आहे.

 

महत्त्व

प्राचीन भारतीयांनी सर्व भौतिक, आधिभौतिक विषयांची (आयुर्वेद ते उपनिषदे) चर्चा केली. जनक-याज्ञवल्क्य हा सर्वश्रेष्ठ वाद मानला जातो, असे बृहदारण्यक सांगते. महाकाव्यकाळात राजे व ऋषी दीर्घकालीन यज्ञयाग करीत आणि त्यावेळी अशा वादसभा भरविल्या  जात असत. बुद्धकाळात ही परंपरा उत्कर्षाला पोहोचली होती. त्या काळात परस्परांविरुद्ध वैचारिक मांडणी करणारे सुमारे साठ वादसंप्रदाय अस्तित्वात होते.

शिस्तीत वाद घडला तर ठीक; पण जल्प आणि वितंडा घडले की सगळेच बिघडते. जल्प ही केवळ शब्दांची फिरवाफिरव असते आणि वितंडामध्ये  केवळ दुसऱ्याच्या युक्तिवादातील दोष काढणे, जहरी टीका करणे, विषारी दिशाभूल करणे असते. हा निव्वळ कांगावा आणि छिद्रान्वेषण आहे, वकील मंडळी बहुधा हेच करतात, असे मत तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अभ्यासक-लेखक सतीशचंद्र चॅटर्जी आणि धीरेंद्रमोहन दत्त यांनी व्यक्त केले आहे.

वादविद्येला चरकसंहितेत फार महत्त्व दिले गेले आहे. तिथे वादसभेला तद्विद्य-संभाषा म्हंटले आहे. तद्विद्य म्हणजे तज्ज्ञ. त्यांची संभाषा म्हणजे वाद होय. तज्ज्ञांचे संभाषण जसेच्या तसे ग्रंथांत निविष्ट करणे या प्रकाराला `तद्विद्य- संभाषा’ असे म्हणतात. याविषयी अधिक माहिती पुढील भागात पाहू.

मनू, याज्ञवल्क्य, नारद इत्यादींच्या धर्मशास्त्रग्रंथातही  वादाचे नियम दिले आहेत. कारण, धर्माच्या अंतर्गत येणाऱ्या कायदा, कर्ज, जमीन, व्यापार, वारसा, राज्यकारभार इत्यादींबाबत धर्मशास्त्राने अतिशय काटेकोर  नियम बनविले होते. पण त्यासोबतच काही  रूढी व  संकेतही  होते, ज्यांबद्दल लोकांमध्ये मतभेद  होते.

त्या काळात वादविद्येला इतके महत्त्व आले की तिला थेट श्रीमद्भगवतगीतेत स्थान मिळाले ! श्रीकृष्ण म्हणतो,

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन |
    अध्यात्मविद्या विद्यानां वाद:प्रवदतामहम्

(गीता १०.३२)

“हे अर्जुना, सर्व सृष्टीचा आदि, मध्य आणि अंत मी, विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी, वाद करणाऱ्यांचा वाद मी (हे तू जाण)”.  येथे वाद याचा अर्थ केवळ चर्चा असा नसून तार्किक चर्चा आणि त्याचा अचूक निष्कर्ष असा आहे.

गीतेचे हिंदू भारतीय जनमानसातील स्थान आणि स्वरूप लक्षात घेता गीतेत एखाद्या विचाराला जागा मिळणे हे खूप महत्वाचे मानले जाते. गीतेची रचना किमान चारशे वर्षे होत असावी. प्रत्येक श्लोक या कालखंडातील विद्वानांनी कसून, तावून-सुखावून घेतला असणार. त्या प्रक्रियेत  हा श्लोक कधी समाविष्ट झाला ते सांगता येणे कठीण आहे.

या संबंधात ज्ञानेश्वरीत पुढील उल्लेख आहे.

 कां जें तूं माझेया विभूती ह्मणौनि तिया आइकैं सुभद्रापती
तरि विद्यां माझि प्रस्तुतीं अध्यात्मविद्या मीं
आगा बोलतेयाचां ठांईं वादु तो मी पाहीं
सकलें शास्त्रसमेत काहीं सरेचिना

 

भावार्थ : जल्प, वितंड यांनी अभिमान, द्वेष आणि क्रोध या दोषांचा प्रभाव वाढतो, लोक चर्चा करतात मिठ्ठास; पण ती  तर्कदुष्ट असते; वाद मात्र संयमित, विवेकपूर्ण, तर्कनिष्ठ निर्णय असतो. म्हणून ‘वाद’ ही माझी विभूती आहे, असे हे सुभद्रापती तू जाण.

 

टिपण :

  1. इतरत्र म्हणजे ‘पुरुषमेध’ या (आज वादग्रस्त ठरलेल्या) यज्ञप्रसंगात द्यावयाच्या बळींच्या यादीत हे तीन पुरुष आहेत ! उदाहरणार्थ यजुर्वेदसंहितेचे  शुक् यजुर्वेद संहिता आणि कृष् यजुर्वेद संहिता असे दोन भाग केले जातात. या दोन्ही भागांत दर्श पौर्णमास, अग्निष्टोम, वाजपेय, अग्निहोत्र, चातुर्मास्य, अश्वमेध, पुरूषमेध अशा यज्ञांचे वर्णन आहे. त्यात बळी दिल्या जाणाऱ्या पशूंची यादी आहे. त्यात ही नावे म्हणजे या पदावर असणाऱ्या पुरुषांचा; तसेच चांभार आणि चरकाचार्य यांचाही समावेश आहे. ! प्राचीन ब्राह्मणग्रंथांनी मनुष्याची गणनाही पशूंत केली आहे. त्यामुळ पुरुषमेधयागात पुरुष हे पशू सांगितले आहेत; मात्र त्यांच्या यागाचे विधान नाही.  या विषयी अधिक माहिती नंतरच्या लेखात देईन.
  2. प्राचीन काळी त्या त्या जातीची-जमातीची पंचमंडळी असत. त्यांना उद्देशून ‘प्रश्निन्’ ‘अभिप्रश्निन्’ आणि ‘प्रश्नविवाक’ हे शब्द वापरले जात होते. न्यायालये हा मोठा व्यवसाय होता. आजच्या जातपंचायतीची मुळे यात असावीत. प्राचीन काळी न्यायालये खासगी होती. सर्वमान्य, सार्वजनिक न्यायालये नसावीत. आजच्या गुन्हेगारी जगाशी जोडली गेलेली समांतर न्यायालये याच स्वरूपाची आहेत, हे विलक्षण आहे !
  3. प्राचीन भारतात परिषद् आणि सभा यात फरक केला जात असावा. असा एक अभ्यास आहे. परिषद् ही सार्वजनिक वादचर्चा होती आणि सभा ही केवळ निमंत्रित तज्ज्ञांसाठी होती. परिषदविषयक अधिक माहिती पुढील लेखात पाहू.

 

(संदर्भसूचीसाठी कृपया लेखकाशी संपर्क करावा – सं.)

ईमेल: shriniwas.sh@gmail.com