दुखऱ्या मूळांपर्यंत

लेखक - द भा धामणस्कर

सकाळ झालीय

फुलझाडांच्या झुंजूमुंजू उजेडात एक

हिंस्र जनावर काठीने

फुलांवर हल्ले करीत आहे.

 

बघता बघता

सगळ्या झाडांचे विविध आविष्कार

परडीत जमा होतील आणि

जनावर देवपूजेला बसेल तेव्हा

इथल्या झाडांना

फुलेच येत नाहीत अशी वदंता

झाडांच्या

दुखऱ्या मूळांपर्यंत पोहचली असेल