हिंदूंमध्ये पोप का निर्माण होत नाही?

लेखक - रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

धर्म: परंपरा आणि परिवर्तन (१)

—————————————————————————-

प्रत्येक धर्मात गेली अनेक शतके कट्टरपंथी वि. सुधारणावादी हा संघर्ष सुरु आहे. हा संघर्ष समजावून घेणे हे आपला भूतकाळाचा अन्वयार्थ लावण्यासाठी, वर्तमानातील कृती ठरविण्यासाठी, तसेच भविष्याचा वेध घेण्यासाठी आवश्यक आहे. हिंदू, ख्रिश्चन व मुस्लीम धर्मात ह्या संघर्षाचे स्वरूप कसकसे बदलत गेले, ह्याचा मागोवा घेणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग

—————————————————————————–  

मानवी इतिहासात विसाव्या शतकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गेल्या अनेक शतकांपासून  साठलेल्या असंख्य उच्चारित-अनुच्चारित प्रश्नांची उत्तरे ह्या शतकाने शोधली. विज्ञान-तंत्रज्ञानातील अद्भुत प्रगतीमुळे रोगराई व अभावग्रस्ततेच्या प्रश्नांची उकल होऊन मानवी आयुष्य विलक्षण सोयी-सुविधा व संपन्नता ह्यांनी गजबजून गेले. त्याचबरोबर विश्वाच्या उत्पत्तीपासून ते मानवी जीवनाच्या प्रयोजनापर्यंत मानवाला पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे नवनव्या वाटांवरून शोधण्यात मानवी प्रज्ञेने धन्यता मानली. म्हणूनच ह्या काळात शोषण व विषमतेला आव्हान देणारी नवी तत्त्वज्ञाने उदयाला आली, समाजवादी व साम्यवादी राज्यव्यवस्था जन्माला आल्या व त्यासोबतच विज्ञानाचा आधार घेत नास्तिकवादापासून अद्वैतापर्यंत अनेक दर्शने नव्याने उभी राहिली. त्यापूर्वीच्या मानवी इतिहासात देव व धर्म ह्या संकल्पनांना अतिशय महत्त्व होते. परंतु युरोपमध्ये तत्पूर्वी उदयाला आलेली नवजागरण (रेनेसाँ) चळवळ आणि त्यासोबत ‘बिग बँग थिअरी’ व उत्क्रांतीवादासारखे शास्त्रीय सिद्धांत ह्यांमुळे  ह्या दोन्ही संकल्पनांना जोरदार हादरे बसले. विज्ञानाला विरोध करू पाहणाऱ्या चर्चला व त्याचे अधिष्ठान असणाऱ्या ख्रिस्ती धर्माला हा फटका अधिकच तीव्रतेने बसला.

 

ह्या पार्श्वभूमीवर विसाव्या शतकात एकीकडे निरीश्वरवाद व निधर्मीवाद वाढीला लागले होते, तर त्याचवेळी धर्म व त्याचे मानवी विकासातील स्थान ह्यांचे महत्त्व मानणाऱ्या व्यक्ती व विचारक धर्म ह्या संकल्पनेची पुनर्मांडणी करीत होते. झपाट्याने बदलणाऱ्या जगात ईश्वर व धर्म ह्या संकल्पना कालबाह्य ठरू नयेत, उलट नव्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी मानवांना त्या साह्यभूत व्हाव्या हा त्यांचा उद्देश होता. विसाव्या शतकात ही घुसळण सर्वच धर्मात घडताना आपल्याला दिसते. ख्रिश्चन धर्मातील चर्चच्या चिरेबंदी सत्तेला आव्हान देत अधिक मानवकेन्द्री धर्म घडविण्याच्या चळवळी ह्याच काळात उदयाला आल्या. मार्टिन ल्युथर किंगच्या नेतृत्वाखालील कृष्णवर्णीय चर्च हे त्याचे उत्तम उदाहरण होय.  ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वज्ञानाचे सर्वात प्रगल्भ रूप लिबरेशन थिऑलॉजी (मुक्तीचे धर्मशास्त्र)च्या रुपात आपल्याला पाहायला मिळते. लॅटिन अमेरिकेत जन्मलेली ही चळवळ कालांतराने जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात पसरली. ‘येशू हा मूलतः दीनदुबळ्यांचा कैवारी होता. गरीब, दलित-शोषित पीडित ह्यांच्या बाजूने उभे राहणे, त्यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे हीच ईशसेवा आहे’ हेच मुक्तीचे धर्मशास्त्र. असा विचार मानणारे असंख्य धर्मगुरू त्या काळात जगभरात विखुरले व अनेक माध्यमांतून त्यांनी दबलेल्या समाजघटकांना जागे करण्याचा, त्यांच्या दुःखांवर इलाज शोधण्याचा प्रयत्न केला. अर्थात जोवर ही मंडळी भूतदयावादी काम करत होती, तोवर चर्चला त्याबद्दल हरकत नव्हती. पण त्यापुढे जाऊन जेव्हा जगातील हिंसा, उपासमार, गरिबी ह्यांना कारणीभूत असणाऱ्या मूलभूत बाबींच्या विरोधात त्यांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली, तेव्हा अर्थातच त्यांनी प्रस्थापित धर्मसंस्थेचा रोष ओढवून घेतला. परंतु त्याची पर्वा न करता अनेक धर्मगुरू पर्यावरणरक्षण, विनाशकारी प्रकल्पांचा विरोध, युद्धविरोध अशा प्रश्नांवर उभ्या राहिलेल्या अनेक जनआंदोलनांत सहभागी झाले, हा (आपल्याला फारसा माहीत नसलेला) इतिहास आहे. मुस्लीम धर्मातही तुर्कस्तानच्या केमालपाशाने धर्माच्या व समाजाच्या आधुनिकीकरणासाठीं योजलेल्या उपाययोजना लक्षणीय आहेत. भारतात सरहद्द गांधी हे इस्लामच्या नव्या रूपाचे प्रतीक होते असे म्हणायला हरकत नाही.

 

विसाव्या शतकातील हिंदू धर्म

ह्या सर्वांच्या तुलनेत हिंदू धर्मातील चित्र मोठे गंमतीशीर होते. एकीकडे धर्मातील पुराणमतवादी प्रवाह अजूनही खिंड लढवीत होता. जातिभेद व अस्पृश्यतेचे समर्थन मोठ्या हिरीरीने केले जात होते. स्त्रियांना शिक्षणाचा, आयुष्यातील कोणतेही निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला नव्हता. भारतातील बहुसंख्य भागांत हीच स्थिती होती. बंगाल व महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांत सुधारणांचे वारे १९व्या शतकापासून घोंघावत होते, तेथे मात्र बदलांना सुरुवात झाली होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीची ही स्थिती पुढे किती बदलली हे आपल्याला सांगायला नकोच. आजही आपण समता-स्वातंत्र्य-न्यायाच्या गंतव्य स्थानापासून खूप दूर असलो तरी एका शतकाच्या कालावधीत त्या दिशेने आपण खूप लांबचा पल्ला गाठला आहे, हे निर्विवाद! हे सर्व घडविण्यात अनेक घटकांचे योगदान असल्याचे आपण मान्य करतो- उदा. तंत्रज्ञानातील बदल, आपले उर्वरित जगाशी जोडले जाणे, स्वातंत्र्यप्राप्तीचे आंदोलन व त्यानंतर स्त्रिया-दलित-शोषित ह्यांनी उभारलेल्या चळवळी इ.  त्याचबरोबर हिंदू धर्मातील अनेक विचारवंत व तत्त्वज्ञ ह्यांचा त्यात मोलाचा वाटा होता हे आपण विसरून चालणार नाही. त्यांनी धर्माची  व्यापक व्याख्या केली, कर्मकांड वगळून त्यातील भक्ती, प्रेम, सेवा ह्या मूल्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, अन्य धर्मीयांबद्दल द्वेष न बाळगता सर्व धर्म शेवटी एकाच अंतिम सत्याकडे नेतात असे आग्रहाने सांगितले. ह्या सर्व घटकांनी हिंदू मानसाचे उन्नयन घडविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा, श्री अरविंद, रवींद्रनाथ टागोर, जे कृष्णमूर्ती, साने गुरुजी ह्यांनी हिंदू परंपरेतील हीण त्यजून तीमधील ऊर्जस्वल, कालसुसंगत व शाश्वत भाग स्वीकारून हिंदू धर्म व संस्कृती ह्यांची  पुनर्मांडणी केली. त्यांनी प्रतिपादन केलेला हिंदू धर्म कोणत्याही अन्य धर्माच्या द्वेषावर आधारित नव्हता. विवेकानंद हिंदू मस्तिष्क व इस्लामी देह अशा भारतवर्षाचे स्वप्न पाहत होते. गांधींचा राम रहीमच्या हातात हात घालून वावरत होता. रवींद्रनाथ ‘चित्त जेथे भयशून्य, उन्नत जेथे माथा’ अशा समाजाचे स्वप्न रंगवत होते. “आज संस्कृतीरक्षणाच्या चळवळी होत आहेत. नवीन विचारांचे वारे येऊ नयेत म्हणून सनातनी नावाची मंडळी किल्ले-कोट बंधू पाहत आहेत; परंतु हे संस्कृतीरक्षक नसून संस्कृतीभक्षक आहेत. भारतीय संस्कृतीचे मढे ते कवटाळू पाहत आहेत व आतील प्राण गुदमरवत आहेत,” असे म्हणणारे ‘कर्ते सुधारक’ साने गुरुजी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी आपल्या जीवाची बाजी लावत होते. जे कृष्णमूर्तीनी तर संघटित धर्माला पूर्णपणे नाकारून जीवनाच्या प्रत्येकच क्षेत्रात नवे प्रश्न उभे करणे, प्रस्थापिताला आव्हान देण्याची क्षमता विकसित करणे ह्या गोष्टींसाठी आपले आयुष्य वेचले. विनोबांच्या मते “सत्यनिष्ठा उपनिषदांचा विषय आहे. करुणेचा विचार मुसलमानी धर्माचा मुख्य विचार आहे. ईश्वराला त्यात ‘रहमानुर् रहीम’ म्हटले आहे. ख्रिश्चन धर्मात प्रेमाचा विचार मुख्य आहे. अशा प्रकारे सगळ्या धर्मांचे सार सत्य-प्रेम-करुणेत आले आहे.” गांधीनी तर ईश्वर हेच सत्य  हा परिपाठ नाकारून सत्य हाच ईश्वर अशी अभिनव मांडणी केली. ‘धर्म व राजकारण ह्यांना परस्परांपासून कायमचे विभक्त करायला हवे’, हा पुरोगामी विचार जगभरात मान्यता पावत असण्याच्या काळात गांधी राजकारणात धर्माने दाखल व्हावे ह्यासाठी आयुष्य पणाला लावत होते; कारण त्यांच्या दृष्टीने हिंदू, मुस्लीम हे संघटित धर्म हे केवळ संप्रदाय होते. ‘धर्म म्हणजे शाश्वत नीतीसूत्रे’ अशी त्यांची धारणा होती. स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत, त्यांनी हे राजकारण केले. पण त्यात साधुसंत, महंत इ. धर्माच्या ठेकेदारांना स्थान नव्हते. धर्माच्या नावावर शेकडो वर्षांपासून सुरु असणाऱ्या अनिष्ट रूढी-परंपरा ह्यांचा त्यांनी विरोध केला. एकूण असे चित्र दिसते की विसाव्या शतकात पुराणमतवादी व नवमतवादी हा संघर्ष जगातील सर्व धर्मात शिगेला  पोहचला असला तरी आपला धर्म तत्त्वज्ञान व आचार (Theory and praxis) ह्या दोन्ही आघाड्यांवर कसा असावा ह्याची जी मांडणी हिंदू धर्माचे अध्वर्यू करत होते, ती इतर धर्मांच्या तुलनेत खूपच प्रगल्भ होती. ह्याचा अर्थ हिंदू धर्मातून अंधश्रद्धा, स्त्रीदास्य व पराकोटीचा जातिभेद  असे दोष नष्ट झाले होते, असा मुळीच होत नाही. पण स्त्री-शूद्र-अतिशूद्रांची परिस्थिती ह्या शतकाच्या प्रारंभी कशी होती व अवघ्या ५-६ दशकांत तिच्यात किती मोठे स्थित्यंतर घडले, ह्याचे आपण साक्षीदार आहोत. ह्या समाजघटकांच्या शोषणास धर्मशास्त्राचे पाठबळ होते, ही गोष्ट ध्यानात घेतल्यास हे परिवर्तन किती कठीण होते (व ह्यापुढेही असणार आहे) ह्याची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

इतर धर्मांच्या तुलनेत आपल्या धर्मात एव्हढे परिवर्तन घडवून आणणे हिंदू धर्मातील क्रियाशील सुधारकांना शक्य झाले, ह्याची अनेक कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्माचे अस्ताव्यस्त स्वरूप. मुळात हे अनेक संप्रदायांचे कडबोळे आहे. येथे विशिष्ट दैवत, उपासनापद्धती, धार्मिक आचार-व्यवहार ह्यांना महत्त्व नाही. एकावेळी अनेक देवताना भजणारी किंवा कोणत्याही देवतेला न मानणारी व्यक्ती हिंदू असू शकते. शैव, वैष्णव, शाक्त व त्यांचे असंख्य उपपंथ आपापल्या पद्धतीने धार्मिक जीवन जगत असतात व त्याविषयी कोणी हरकत घेत नाही. हिंदू माणूस आपल्या धर्माचे पालन करताना माउंट मेरी किंवा पिराला नवस बोलू शकतो, आपला एक मुलगा शीख होईल असे ठरवू शकतो. आचार-विचारातील कमालीची लवचिकता व मोकळेपणा हीच हिंदू धर्माची निजखूण आहे असे म्हणण्यास हरकत नाही. दुसरी बाब ही की हिंदू धर्मात पुरोहीतशाही ( व तीही जन्माधिष्ठित) असली, तरी ख्रिश्चन चर्चप्रमाणे ती आपल्या अनुयायांच्या जीवनाचे नियमन करण्याएव्हढी शक्तीशाली नाही. हिंदू धर्मातही चार शंकराचार्य आहेत (त्याशिवाय स्वयंघोषित वेगळेच!) व तेही वेळोवेळी चातुर्वर्ण व स्त्रीदास्य ह्यांचे समर्थन काढणारी वक्तव्ये करीत असतात. पण त्यांचा प्रभाव १% हिंदू जनतेवरदेखील नाही. हिंदू धर्मातील पंथ-उपपंथ हजारो वर्षे जुने असले व त्यामुळे त्यांच्यात  अनेक कालबाह्य विकृती साचल्या असल्या, तरी त्यात सुधारणेची एक परंपराही शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. धर्माची बंधने जेव्हा असह्य होतात, कर्मकांडांना ऊत येतो, धर्मातील सारभूत भाग विसरला जातो, तेव्हा त्या साचलेपणाविरुद्ध हिंदू धर्मात वेळोवेळी बंडे झाली आहेत व बंडखोरांनी आपले नवे दर्शन, नव्या उपासनापद्धती रुजवल्या-वाढवल्या आहेत. ह्या परंपरेचे सर्वात महत्त्वाचे उदाहरण म्हणजे १३-१४व्या शतकात जन्मलेली व अजूनही प्रभावहीन न झालेली भक्ती-चळवळ. राजस्थानमधली मीरा, गुजराथेतला नरसी मेहता, महाराष्ट्रातले अवघे महानुभाव-वारकरी, तिथलाच पण थेट पंजाबात रुजलेला नामदेव, बंगालातले चैतन्य महाप्रभू, दक्षिणेतले बसवेश्वराचे अनुयायी ते अक्का-महादेवी .. अशी कितीतरी नावे आहेत. सूफी पंथाच्या सोबत त्यांनी काश्मीरपासून केरळपर्यंतच्या भारतात प्रेम व भक्तीवर आधारित ईशोपासनेचे नवे तत्त्वज्ञान फुलवले. ज्या तत्त्वज्ञ-सुधारकांनी विसाव्या शतकात  हिंदू धर्मात  अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले, त्या सर्वांची मुळे भक्ती-परंपरेत रुजली होती, हे लक्षात ठेवायला हवे.

 

उलट दिशेने वाटचाल

परंतु, विवेकवादाकडे होणारी जगाची वाटचाल विसाव्या शतकाच्या अखेरच्या टप्प्यावर अचानक थांबली. भांडवलशाही व साम्यवाद ह्या दोन ध्रुवांनी तोलून धरलेला पृथ्वीचा समतोल, त्यापैकी एक ध्रुव निखळल्यामुळे ढासळला. कोणालाही न जुमानणारा जगतीकारणाचा अश्वमेध वारू सारे जग पादाक्रांत करीत निघाला. नागडी भांडवलशाही, माणसाला कमालीचे आत्मकेंद्री बनविणारे तंत्रज्ञान, टोकाची विषमता ह्या सर्वांमुळे विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांमध्ये जगात अभूतपूर्व बदल झाले. झंझावाती परिवर्तनाची ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. त्यामुळे मानवी नातेसंबंध मोडीत निघाले. माणूस प्रचंड एकाकी झाला व आपल्या एकाकीपणाचे उत्तरही तो कृतक-वास्तवात शोधू लागला.

आरशातल्या आरशात झाले बेपत्ता     

अशी मानवजातीची अवस्था झाली. शेअर बाजारातून रातोरात करोडपती झालेला मध्यमवर्गीय असो की

विकास-प्रकल्पात शेतजमीन गमावून कंगाल झालेला शेतकरी, दोघांनाही कमालीच्या असुरक्षिततेने घेरले. दोघेही  मग देवा-धर्मात सुरक्षितता शोधू लागले. ‘रिटायरमेंट’ला आलेल्या देवाची डिमांड  अचानक वाढली. इतकेच काय एकेकाळी त्याच्याकडे पाठ फिरविणारे त्याचा शोध घेऊ लागले.

देवाधर्माचा बाजार तेज झाला. देऊळ-चर्च-मशिदीतला देव बाजारात गल्ल्यावर जाऊन बसला. त्यासोबत आंतरराष्ट्रीय राजकारणातील पटदेखील बदलला. ह्या सर्व कारणांमुळे सर्व धर्मातील पुराणमतवादी वि. नवमतवादी ह्या संघर्षाने नवे रूप घेतले. मुस्लीम धर्मात अरबकेन्द्री मूलतत्त्ववादी प्रभावी ठरल्यामुळे त्यातील उदारमतवादी परंपरा क्षीण होऊ लागली आहे. विवेकानंद-गांधींचा हिंदू धर्म आसारामबापू-राधे मांच्या ताब्यात गेला आहे व विसाव्या शतकात प्रभावहीन ठरलेले त्यातील स्वयंघोषित नेते त्याच्या तालिबानीकरणाची स्वप्ने पाहू लागले आहेत. ह्याउलट ख्रिश्चन धर्मात खुद्द पोपने चर्चच्या चिरेबंदी किल्ल्याला सुरुंग लावून एका मोकळ्या, समताधिष्ठित अवकाशाचे स्वप्न जगाला दाखवले आहे. ते पाहून “हिंदू धर्माला एक  पोप फ्रान्सिस मिळेल का?’ असा प्रश्न खऱ्या हिंदू धर्माच्या समर्थकांना पडल्यास आश्चर्य नव्हे. ह्या स्थित्यंतराची चर्चा पुढच्या भागांत करू.