आत्मशोधार्थ शिक्षण

लेखक - बालकृष्ण पिशुपती

 

शिक्षण स्वतःचा शोध व समृद्धी ह्यांसाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी कसे उपयोजित करता येईल, विद्याशाखांमधील कृत्रिम भिंती कशा तोडता येतील, शिक्षणक्षेत्रात प्रेरणा व स्वातंत्र्य ह्यांचे महत्त्व काय, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा परामर्श घेत व त्याला स्वानुभव जोडत आंतरराष्ट्रीय एका युवा विख्यात शास्त्रज्ञाने मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभात केलेल्या भाषणाचा संपादित अनुवाद.

—————————————————————————–

तुमच्यापैकी बहुतेकांना ठाऊक असेल की दीक्षान्त संदेशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये शुभारंभाचे भाषण म्हणतात. विविध विषयांतील स्नातकहो, पदवी प्राप्त करून आज तुम्ही बाहेरच्या जगात स्वत:ची ताकद आजमावण्यासाठी, स्व-गुणवत्तेच्या बळावर व्यक्ती म्हणून उत्क्रांत होण्यासाठी, जीवनात नव्या वाटेवर शुभारंभ करण्यासाठी पाऊल टाकत आहात.

मित्रहो, अभिनंदन आणि अभीष्टचिंतन!

ह्या प्रसंगी आपल्या गुरुजनांचे स्मरण ठेवा.  केवळ शिक्षणातच त्यांची मदत झाली असे नाही तर आजवरच्या जीवनप्रवासात त्यांनी आपल्याला आधार दिला. त्यांच्याजवळचे ज्ञान त्यांनी आपल्याला वाटून दिले.

इथे एका संस्कृत श्लोकाची आठवण होते.

न चौरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारि।

व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्॥

अर्थात, ज्ञानास न चोरून नेता येते, न राजाला ते लाटता येते, भावंडां-बरोबर वाटणी करण्याची गरज नाही आणि त्याचे ओझेही नाही. असे हे विद्याधन नेहमीच दिल्याने वाढते म्हणून सर्वप्रकारच्या धनांमध्ये विद्याधन हे श्रेष्ठधन होय.

म्हणूनच जितके जास्त शिकाल तितके अधिक तुम्ही लोकांना देऊ शकाल.

आज इथे जमलेले तुम्ही सारे भाग्यवंत आहात. भारतात स्थापन झालेले केवळ दुसरेच असल्याने या विद्यापीठाने देशाला अनेक विद्वान आणि महनीय व्यक्ती दिल्या. विद्यापीठाचा इतिहास सांगणार्‍या “द क्लॉइस्टर्स पेल” या चरित्रग्रंथातून व्यक्त होते की शिक्षण केवळ पदवीसाठी नव्हे तर व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व देण्यासाठी हा विचार येथे झाला. स्थापनेपासूनच या विद्यापीठाने एकमार्गी नव्हे तर बहुआयामी व्यक्तिमत्त्वे घडविली. अल्बर्ट आईन्स्टाईनने म्हटले आहे, महाविद्यालयीन शिक्षणाचे मूल्य केवळ काही तथ्य शिकण्यापुरते नाही तर ते मनाला विचार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आहे. तुम्ही काही सत्ये शिकलात, त्यांची परीक्षा झाली आणि इथे येण्याची परीक्षा तुम्ही पास झालात. पण एक प्रश्न स्वत:ला जरूर विचारा — तुम्ही किती विचार करू शकता आणि स्वत:च्या नि समाजाच्या भल्यासाठी त्यापैकी किती कृतीत रूपांतरित करू शकता? मूल्याधिष्ठित आणि गुणाधिष्ठित स्पष्टतेने विचार करा.

ई बुक्सच्या जमान्यात तुमच्यापैकी कितीजणांनी लहानपणी चित्रांची नि गोष्टींची पुस्तके वाचलेली असतील याची मला शंका आहे. छोट्यांचे प्रिय मासिक चंदामामा मी माझ्या लहानपणी तेलुगुतून वाचल्याचे मला कायम स्मरत असते. जिचा माझ्या मनावर ठसा उमटला आहे अशी ही चंदामामातील एक कथा —

एका खेडेगावात अतिशय हलाखीत जगणार्‍या एका गरीब शेतकर्‍याची. शेतकरी त्याची पत्नी आणि अंध आई यांसह दु:खात दिवस काढत असतो. त्याला नि त्याच्या पत्नीला संतती हवी असते पण संतती असणे त्यांना परवडणारे नाही.

एके दिवशी परमेश्वर त्या शेतकर्‍यासमोर प्रकटतो आणि म्हणतो एक वर माग. तो शेतकरी नि त्याचे कुटूंब गोंधळून जातात. त्यांना श्रीमंत बनायचे होते, बाळ हवे होते नि आईसाठी दृष्टीही. क्षणभर विचार करुन शेतकरी परमेश्वराकडे जाऊन म्हणतो एका वराने तो नक्की सुखी होईल. बिचार्‍या शेतकर्‍याची हलाखी माहीत असलेल्या परमेश्वराला मजा वाटते, कसा काय बुवा हा एकाच वरात याच्या सार्‍या आशा पुर्‍या करवून घेणार.

शेतकरी परमेश्वराकडे वळून वर मागतो तो असा, “हे परमेश्वरा, माझ्या आईने माझ्या राजवाड्यातील सोन्याच्या पाळण्यात खेळणारा तिचा नातू पाहावा म्हणजे झाले”.  बुद्धिचातुर्यपूर्वक व्यक्त केलेल्या या एका इच्छेने प्रसन्न होऊन परमेश्वर शेतकर्‍याची इच्छा पूर्ण होईल असा वर देतो. त्यायोगे शेतकरी श्रीमंत होतो, त्याला बाळ मिळते, शेतकर्‍याच्या आईला दृष्टी मिळते.

साधारण दहा वर्षांचा असताना वाचलेल्या या गोष्टीने दिलेला संदेश होता – यशाची केवळ अपेक्षा धरून भागत नाही, ते साध्य होण्यासाठी मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करता येईल असे तीक्ष्ण मन तयार करायला हवे.

अमेरिकेचे नेते अब्राहम लिंकन यांचे एक वाक्य आहे — युद्धासाठी तुमच्याकडे १२ तास असतील तर त्यांपैकी अकरा तास तुम्ही तुमच्या शस्त्रांना धार लावण्यासाठी वापरा. आपल्यापैकी सर्वांना खूप गोष्टी हव्या असतात आणि आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण खूप राबतही असतो. पण आपण जर या शेतकर्‍यासारखे संधी पकडण्यासाठी तयार नसू तर आपल्या आकांक्षांची यादी लांबत जाईल, परंतु स्वप्नांची पूर्तता होणार नाही.

शिक्षण तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी लागणारी साधने आणि आवश्यक अशा संधी उपलब्ध करून देते. पण हे शिक्षण म्हणजे तरी काय?

तुम्ही लोकांना हा प्रश्न विचारला तर बहुतेकदा तुम्हाला तेच ते लोकप्रिय उत्तर मिळेल, आधी पदवी आणि त्यायोगे एक आकर्षकशी नोकरी मिळविण्यास करण्याचा अभ्यास. गेल्या काही दशकांत, विशेषत: भारतात शिक्षणाची संकल्पना आणि मूल्ये पूर्णत: बदलून गेली आहेत ही नोंद घेण्याची बाब आहे. .

आपल्याकडे शिक्षणक्षेत्रात कार्यकर्त्यांपेक्षा व्यावसायिकांची संख्या जास्त आहे; शिकविणारे जास्त आहेत, प्रेरित करणारे मोजकेच. आज आपल्याकडे पूर्वीपेक्षा अधिक महाविद्यालये नि विद्यापीठे आहेत. स्थूलमानाने पाहता प्राथमिक शिक्षणापर्यंत पोहोचण्याच्या संधी वाढविण्याचे उद्दिष्ट आपण साधले आहे. शिक्षणामध्ये लैंगिक समतोलाची खात्री देणारे चांगले धोरण आपल्याकडे आहे. शिक्षण हा मानव-अधिकार मानला गेलाय. हे सारेच प्रतिभेचे द्योतक आहे आणि या परिवर्तनाचा भाग असलेल्या प्रत्येकाचे आपण अभिनंदन केलेच पाहिजे.

थोडे थांबूया. पदवीधरांच्या नि नोकरदारांच्या वाढलेल्या संख्येबद्दल का आपण हे बोलत आहोत? की आपण खर्‍या अर्थाने शिक्षित लोक वाढले असे म्हणत आहोत? संभ्रम आहे ना? गेल्या काही दशकांत नेमके काय बदलले आहे ते मी खालील दोन मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करणार आहे.

स्फूर्ती ही दर्जेदार शिक्षणाची गरज आहे

आज युवामनाला प्रेरित करणे हे आपले लक्ष्य असल्याचे दिसत नाही. प्रसिद्ध इतिहासकार हेन्री ऍडमनी म्हटले आहे, “शिक्षक हा कालातीत परिणाम साधत असतो. त्याच्या प्रभावाची सीमा कुठवर हे तो कधीच सांगू शकणार नाही”. विद्यार्थ्यांच्या उर्मी जागविणार्‍या शिक्षकांचे समूह  ही शिक्षणजगतातील सर्वांत मोठी घटना असेल. हे माझे विधान केवळ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांपुरते मर्यादित नाही तर शिक्षणाची आस असणार्‍या समाजातील प्रत्येकाला अनुलक्षून आहे.”

विद्यार्थ्यांकडे शिक्षकांकडून प्रेरणा अनेक मार्गाने येईल. मग त्यामध्ये ज्ञानाचा व्यासंग, सामाजिक भान, व्याख्यानकौशल्य, लोक जोडण्याची कला, करुणा, शिक्षकाचे होतकरूपण वा खडतर कष्टांसाठी असलेली तयारी असे कितीतरी. एका चांगल्या शिक्षकामध्ये यांपैकी किमान एक तरी गुण असला पाहिजे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे चांगल्या शिक्षकाला विद्यार्थ्यांशी जोडून घेत, त्यांची मने जिंकून आपले हे गुण त्यांच्यात उतरवता आले पाहिजे.

स्टीफन हॉपसन एक यशस्वी भागदलाल आणि प्रेरक लेखनासाठी प्रसिद्ध अशी व्यक्ती. कर्णबधिर असलेल्या स्टीफनना सामान्य मुलांच्या शाळेत घातले होते. त्या नियमित वर्गाशी जुळवून घेण्यात त्यांना खूप अडचणी येत. विशेषत: सहाध्यायीं त्यांची टर उडवत असल्याने त्यांचा आत्मसन्मान सदाचाच खालावलेला. एके दिवशी तेथील एका विद्यार्थिप्रिय शिक्षिकेने वर्गाला एक प्रश्न विचारला. शिक्षिकेच्या ओठांच्या हालचाली काळजीपूर्वक वाचल्याने स्टीफनना तो प्रश्न कळाला आणि त्याचे उत्तर त्यांनी स्वयंस्फूर्त दिले. तोपर्यंत इतरांना त्या प्रश्नाचा अजून नीट बोधही झालेला नव्हता. आश्चर्यचकित शिक्षिकेने जोसात म्हटले, “अगदी बरोब्बर, स्टीफन!” ते तीन शब्द आणि त्या शिक्षिकेचे ते उच्चारण यांतून लहानग्या स्टीफनच्या मनात पुष्कळ आत्मविश्वास रुजला. पुढे हा स्टीफन यशवंत होऊन अनेकांना प्रेरित करता झाला.

माझे अनेक प्रेरणास्रोत आहेत. माध्यमिक शाळेत शंकरराव नावाचे माझे जीवशास्त्राचे शिक्षक होते. ते मोठे चित्रकार. तासाभरातील पंचेचाळीस मिनिटे ते केवळ एका फुलाचा वा खोडाचा छेद काढण्यात घालवीत. तशी त्यांची शिकवण्याची क्षमता जुजबी होती पण त्यांच्या चित्रकारीतील केवळ रंग आणि आकृतिबंधांनी मला जीवशास्त्राची इतकी गोडी लावली की मी पदवीसाठी जीवशास्त्र हा मुख्य विषय ठेवला. माझे दुसरे प्रेरणास्थान माझे आणखी एक शिक्षक डॉ. रामन ज्यांची शास्त्रीय संशोधनपर निबंध अत्यंत अचूक शब्दांत मांडून कठीण संकल्पनांचे गोष्टीरूपाने निरूपणाची हातोटी मी आत्मसात केली. सर्वस्वी विखुरलेल्या अनेक गोष्टींच्या बांधणीतून एखाद्या बिंदूपर्यंत पोहोचण्याचे डॉ.स्वामिनाथन यांचे कौशल्य आजही मला निःस्तब्ध करून सोडते.

शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना प्रेरित करायचे असेच नाही काही. उलटही घडू शकते. मी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकत असतांना शंकानिरसनार्थ एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या भेटीसाठी धडपडत होतो. प्राध्यापक महोदयानी ते काही दिवस जर्मनीच्या प्रवासात असल्याने नंतर भेटूया असे म्हटले. ते एखाद्या परिषदेसाठी चाललेत का असे मी कुतूहलापोटी विचारले तर उत्तरात त्यांनी ते जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठात एका विद्यार्थ्याच्या भेटीस निघाले असल्याचे सांगितले. मला वाटले, नक्कीच मौखिक-परीक्षेसाठी असणार. तितक्यात, मस्त कल्पनांचा स्वामी असलेल्या त्यांच्या आढळातील एका हुशार विद्यार्थ्याशी बोलून त्याला आपल्या केंब्रिज येथील चमूमध्ये निमंत्रित करण्यास तेथे चाललो आहे असे ऐकवून त्यांनी मला थक्क केले.

एक प्राध्यापक एका विद्यार्थ्याच्या भेटीस जाऊन त्याला आपल्या संशोधकमंडळात येण्यास विनंती करतो हे भारतातून आलेल्या माझ्यासाठी कल्पनातीतच! पुढील दहा वर्षांत या गुरु-शिष्य जोडगोळीने २००९ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जिंकले.

आपल्याला भारतामध्ये अशा प्रकारचे शिक्षक-विद्यार्थी संबंध हवेत. ते नाते आदर आणि विश्वासात भिजलेले असावे, ज्ञानाच्या शोधार्थ असावे, केवळ श्रेणीने आणि गुणांनी मापलेले ते नसावे. शिक्षणाच्या प्रांतात स्वातंत्र्य या विषयाला वेशभूषा आणि मूल्यमापनाच्या उत्तम पद्धती याहून खूप अधिक अर्थ आहे. आपल्याला प्रेरक बनायचे आहे, प्रेरितही असायचे आहे.

ज्ञान विद्याशाखानिहाय नसते

पदवीपुरते ज्ञान हा जीवनविद्येपेक्षा वेगळा विषय. विद्यार्थ्यांस त्यांच्या रोजच्या शैक्षणिक-विश्वापार काही गोष्टी वाचून समजून घेण्यास उद्युक्त करणे हे आधुनिक शिक्षणासमोरचे एक मोठे आह्वान आहे. शिक्षण हे निव्वळ पाठ्यक्रमावर बेतलेले नको, ते व्यक्तीच्या रुचीनुरूप होणे आवश्यक आहे. पाठ्यक्रमात तडजोड करावी असे नव्हे पण तेथे लवचिकता जरूर हवी.

आर्यभट्ट, वराहमिहिर, व्यास, पतंजली, चार्ल्स डार्विन, ऍडम स्मिथ, नोआम चोम्स्की, रॉजर पेनरोज, एडवर्ड विल्सन यांसह अशा डझनावारी यशस्वी शास्त्रज्ञांची आणि तत्त्ववेत्यांची उदाहरणे मी देईन की ज्यांनी आपले औपचारिक शिक्षण एका विज्ञानविद्याशाखेमध्ये घेतले पण त्यांचे जगाला नव्या वाटांवर नेणारे संशोधन दुसर्‍याच एखाद्या क्षेत्रात घडले. कारण या सर्वांनीच शिक्षण-परीक्षा-व्यवसाय अशा साखळी पलीकडे स्वत:ची आवड जपली आणि उपलब्ध संधींचा उत्तम तर्‍हेने उपयोग करून घेतला.

भारतीय विद्यापीठांच्या प्रांतिक आणि जागतिक स्तरावरील दर्जांकाबद्दल आणि आमच्या विद्यापीठांनी जगातील सर्वोत्तमांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी काय करावे याविषयी व्याकुळ होत सादर केलेल्या बर्‍याचशा टीका आपण नेहमीच वाचतो. आपल्याला स्पर्धेत उतरायचे नि जिंकायचे असेल तर अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन या तीनही मध्ये क्रांतीची गरज आहे.

केवळ शाखाबाह्य नि आंतरशाखीय अध्यापन-संशोधनाच्या संधींनी काम भागणार नाही. आपल्याला मुळात हे पटायला हवे की केवळ विद्यार्थ्यांना नवे संशोधन-प्रकल्प देऊन हे साधणार नाही तर त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना नि शिक्षकांनाही प्रशिक्षण आणि नवे वळण द्यायला हवे. विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व शिक्षणात कला, शास्त्र वा वाणिज्य यांपैकी एक आणि एकच शाखा निवडावी अशी सक्ती करणारे बुरूज (ज्यांतून आत-बाहेर करणे सोपे नसल्याने विद्यार्थ्यांचे संपूर्ण व्यावसायिक भवितव्य एकदाच पक्के होते), आपल्याला तोडायला हवेत. उत्क्रांती आणि परिस्थितिकी हे विषय सामाजिक आणि मानसशास्त्राच्या अध्यापनात आले पाहिजेत, वनस्पती आणि प्राण्यांच्या वर्तनाच्या अभ्यासातून वास्तुशास्त्राच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना स्फूर्ती मिळायला हवी. फुलांचे सडे नि बियांच्या विखुरण्यांतून विमान-अभियंत्यास प्रेरणा मिळावी. पारंपरिक ज्ञानाला वैद्यकशास्त्रांत स्थान हवे, समाजशास्त्र हे विज्ञानाच्या पाठ्यक्रमाचा भाग व्हावे, हे आणिकही असेच.

आज तुमच्यासाठी या सगळ्याचा अर्थ काय ते आता मला सांगू दे.

जगाच्या वास्तविकतेशी सामना करण्यासाठी तुम्ही बाहेर पोहोचत आहात. काही महिन्यांत तुम्हाला तुमचे जीवनध्येय निश्चित करायचे आहे, जीवनात स्थिर व्हायचे आहे आणि आजवरच्या तुलनेत मोठ्या जबाबदार्‍या स्वीकारायच्या आहेत. याची तयारी कशी करायची ते वर्गाच्या चार भिंतींमध्ये नव्हते शिकवले. निरीक्षणे, प्रयोगबुद्धी, आकांक्षांचे मूल्यमापन आणि भवितव्याची बहुपर्यायी आखणी यांतून बरेचसे शिकणे होत असते.

कधी कधी आपल्यापैकी पुष्कळजण इच्छिलेले सारे मिळण्याइतके नशीबवान नसतात. परंतु आपल्याला आपल्या योग्यतेनुसार मिळावे यासाठी आपण प्रयत्न नेहमीच करू शकतो. आता तुमच्या योग्यतेचे काय हे तुम्हाला कसे कळणार? तुम्ही जे उत्तम तर्‍हेने करता त्याच्याशी तुमच्यायोग्य काय ते थेट संबंधित असते. काय नि कसे कराल त्यांबद्दल तुम्हाला आंतरिक आस आणि अभिमान वाटेल तर त्या कृती उत्तमच होतील.

आज टाळ्यांच्या गजरानंतर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मार्गांवर निघण्यापूर्वी, तुम्ही कराव्यातशा चार गोष्टी मी उद्धृत करणार आहे.

       तुमच्या आवडींशी तडजोड करू नका. तुम्हाला आवडेल तेच करता येईल असे मार्ग शोधा

मी सहा वर्षांचा होतो तेव्हा माझे वडील गेले. आर्थिक गरजांसमोर टिकाव धरणे हे कुटुंबासमोरचे मोठे आह्वान होते. माझे शालेय शिक्षण कधीतरी पूर्ण होईल असे वाटले नव्हते. लवकरच मला वृत्तपत्रकारितेत रस निर्माण झाला आणि मी खूप वाचायला लागलो. बहुतेकदा आमच्या घराजवळच्या ग्रंथालयातून मी पुस्तके आणत असे. दृष्टी अधू असलेले माझे चुलते मला मदत करीत. दररोज मी त्यांना “द हिंदु” हे वृत्तपत्र वाचून दाखवीत असे. सुरुवातीस माझे ते काम यांत्रिक वाचकासारखे, म्हणजे मजकूर फारसा न समजताच चालले. काका नेहमी एकच सांगायचे, एकदा वाचून समजले नाही म्हणून चिंता करू नको. वाचत राहा आणि तुला ते समजायला लागेल. यातून माझे वाचन, आकलन आणि लेखन ह्यांचा पाया भरला गेला.

अशीच शाळेच्या दिवसांत मला विज्ञानाची खास गोडी लागली आणि एक दिवस माझ्यावर बेतली. माझ्या शिक्षकांनी उठवून मला मी माझे नाव बालकृष्ण पी. एमएससी. असे लिहिण्याबद्दल जाब विचारला होता. मी निरागसपणे म्हणालो, मी विज्ञानमंडळाचा सदस्य आहे (Member of Science Club). पदव्युत्तर पदवी कशाशी खातात वा ते संक्षिप्तरूप नेमके कसे लिहितात यांपैकी काहीही माहीत असण्याचे ते वय नव्हते.

पदवीधर होताहोताच मला भारतीय रेल्वेत वरिष्ठ कारकुनाची नोकरी मिळाली. कुटुंबातील प्रत्येकालाच यामुळे प्रचंड आनंद झाला, मला मात्र नाही. मला माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करायचे होते. म्हणून मी रेल्वेच्या मानव संसाधन अधिकार्‍याकडे गेलो आणि एमएससी पूर्ण करण्याचे कारण देऊन दोन वर्षांनी रुजू होण्यासाठी परवानगी मागितली. त्या दयाळू गृहस्थांनी मला तेवढा वेळ दिला. मी एमएससी पूर्ण केले आणि परीक्षा संपल्याच्या दोनच दिवसांत नोकरीवर रुजू झालो.

माझ्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यास ही नोकरी पुरेशी असली तरी तिथून निघण्याची हरेक संधी मी शोधत होतो. कारण कारकुनीमध्ये मला एक दिवसही आनंद नव्हता. एके दिवशी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची संधी मला मिळाली, अशी संधी जी मला त्या नोकरीतून मुक्ती देईल. प्रवेशप्रक्रिया पूर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळेपर्यंत दीड-एक वर्षाचा कालावधी गेला. तेवढ्या वेळात संशोधनासाठी तयारी करायची आहे अशा सबबीवर मी रेल्वेमधील नोकरी सोडून चेन्नई येथील कीटविज्ञानी अनुसंधान केंद्रामध्ये (Entomology Research Institute) सहाय्यक संशोधक म्हणून रुजू झालो होतो. खरे तर एका पदव्युत्तर पदवीधराच्या मानाने खूपच खालचे पद, पण तत्काळ उपलब्ध असलेली ती एकच जागा होती…

एका वर्षाच्या आत तीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधनपत्रिकांमधून माझे पाच संशोधननिबंध प्रसिद्ध झाले होते.

केंब्रिजमध्ये शिकायला जाणे हे जीवनाला कलाटणी देणारे होते. केवळ संशोधनासाठी नव्हे तर जीवनविषयक एक वेगळा दृष्टिकोन या अनुभवाने दिला. तेथे नोबेल पुरस्काराच्या मानकर्‍यांबरोबर वा स्टीफन हॉकिंग्ज यांच्याबरोबर गप्पा ही नेहमीच, अगदी कॉफी टेबलवर घडणारी गोष्ट असे. माझ्यात पूर्वी अगदीच नगण्य असलेले जनमानसात वावरण्याचे कौशल्य विकसित करण्याचा विश्वास अशा संभाषणांनी मला दिला.

एक चांगला संशोधनप्रकल्प आणि शेल बायोटेक्नॉलॉजी कंपनीतील जागा यांसह माझे संशोधन उत्तम चालले होते. १९९०च्या नाताळच्या सुट्टीत चेन्नईमध्ये असताना माझी डॉ. स्वामिनाथन यांच्याशी एक अनौपचारिक भेट झाली. तेथेच त्यांच्या नव्या संशोधनसंस्थेत सामील होण्याचे निमंत्रण मिळाले. त्यांनी मला देऊ केलेली एक गोष्ट म्हणजे संस्थेच्या जैवविविधता आणि जैवतंत्रज्ञान या विषयांवरील संशोधनकार्यास आकार देण्यासाठीचे पूर्ण स्वातंत्र्य आणि सहकार्य.

पुन्हा एकदा मला एक कठीण निर्णय घ्यायचा होता. केंब्रिजमध्ये पीएचडी पूर्ण करायची की भारतात येऊन नव्या, उभरण्यास उत्सुक अशा एका अशासकीय संस्थेत सामील व्हायचे? मी विचार केला, केंब्रिजमधून पीएचडी करणे कौतुकाचे आहेच पण तिथल्या शेकडो पदवीधरांपैकी मी एक होणार. काही नवे स्थापन करण्याची कौशल्ये विकसित करण्यास वाव तसेच नव्या संस्थेच्या उभारणीत सहभागी होण्याची अनोखी संधी पुन्हा कुठे? थोडक्यात, मी चेन्नईमध्ये येऊन संस्थेस मिळालो.

तो निर्णय कधीच चूक ठरला नाही. केवळ २६ वर्षांचा असताना मला भारतामध्ये एक संस्था उभारून तेथे सर्वंकष अशी संशोधनसुविधा निर्मिण्याच्या प्रक्रियेबद्दल प्रचंड शिकायला मिळाले. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान कार्यक्रमाला आकार देण्यासाठीच्या कार्यदलात सदस्य म्हणून मला निमंत्रिले तेव्हा मी फक्त २७ वर्षांचा होतो. तेथला प्रत्येक सदस्य वयाने ज्येष्ठ अशा प्रथितयश व्यावसायिक सदस्यांचे सरासरी वय साठीच्यावर असलेल्या त्या कार्यदलाच्या पहिल्या सभेसाठी खोलीमध्ये शिरतानाचे माझे अवघडलेपण अजुनही मनात घोळतेय.

हळूहळू मी विविधप्रकारच्या महत्त्वाच्या जबाबदार्‍या घेत गेलो. त्यामुळे मला नेहमी हवीशी असणारी गंभीर आह्वाने आणि निर्णयात्मक पेचप्रसंग मिळवण्यात मदत झाली. अनेक आंतरराष्ट्रीय अशासकीय संस्था, संयुक्त राष्ट्रसंघ, भारत सरकार तसेच एका आंतरराष्ट्रीय विचारमंचाकडून चालून आलेली पदे हे त्याचे फलित होय. आज संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातील पर्यावरण-कायदा विभागाचे नेतृत्व करणार्‍यांमध्ये कायदेपंडित नसलेला मी एकमेव आहे.

कोणत्याही पदावर कार्यरत असताना कामाचे स्वरूप आणि मानधन यांच्यापलीकडे मनाला रुचेल ती कृती आणि स्वत:च्या क्षमतांनुसार उत्तम योगदानाची हमी या माझ्या तत्त्वांशी मी कधीच तडजोड केली नाही.

जोखीम टाळू नका

इथे मी असा धडा शिकलो की तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा आणि आवडीच्या विषयांचा पाठपुरावा करायचा असेल तर थोडी जोखीम पत्करण्याची तुमची तयारी लागेलच. प्रयोग करायचे, एखादे घबाड हाती लागायचे तर ते जोखिमीशिवाय होणे नाही. मनातले बोलायचे असो वा नेहमीच्या उबदार वातावरणातून दूर होण्याशिवाय पर्याय नसलेला निर्णय असो, तुम्हाला जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारणे क्रमप्राप्त असते. एक लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्याच योजना यशस्वी होतील असे नाही. पण मनात होते ते घडवण्याचा प्रयत्नही करायचे राहून गेले असा विषाद तरी तुम्हाला कधीच नसेल.

तुम्ही यशाच्या विचाराने गेलात म्हणजे झाले असे नव्हे. यश संपादण्यास काय करावे हे तुम्हाला माहीत हवे, यशाप्रत पोहोचण्यात संयम हवा. तुम्हाला तुमची ध्येये निश्चित करायची आहेत आणि जोखीम-व्यवस्थापनाचा अवलंब करीत त्या ध्येयांच्या दिशेत मार्ग आक्रमायचा आहे.

खरी यशस्वी माणसे अनुभवी आणि जोखिमीला सरावलेली असतात. खरे तर, यशस्वी माणसे जोखिमीच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतरच कोणत्याही संधीच्या मागे जातात असे म्हणणे अधिक योग्य होईल. भारत आत्मनिर्भर होण्याची तयारी करत असण्याच्या काळात डॉ अब्दुल कलाम यांच्यासारख्या शास्त्रज्ञांनी स्वीकारलेली जोखीम आणि त्यातून भारताने संपादिलेले अणू आणि अवकाश कार्यक्रमांतील यश ही याची उदाहरणे होत.

तुम्ही तुमच्या भवितव्याबद्दल चाचपडत आहात. या काळात कसली जोखीम घेणार नि तिचे व्यवस्थापन करणार?

तुमच्या सहकार्‍यांच्या तुलनेत उजवे असे जीवनध्येय ठरवा. तुम्ही वास्तुविशारद असाल तर निसर्गाची नक्कल करून अनोख्या आकृतिबंधांचे निर्माण, उत्पादन करा. तुम्ही साहित्याचे विद्यार्थी असाल तर साहित्य आणि संस्कृतीची उत्क्रांती समजून घेण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रयोग करा. अर्थशास्त्राचा अभ्यास करणार असाल तर पर्यावरणपूरक गुंतवणुकीसंदर्भात जोखिमदारांना सल्ला देता येईल असा तुमचे वेगळेपण जपणारा पर्याय निवडा.

या आगळ्या वाटांवर स्पर्धा कमी असल्याने तुमच्यापैकी अनेकांना तेथे चमकदार व्यावसायिक यश प्राप्त करता येईल. त्यातून तुम्हाला आजवर आमच्या शिक्षणपद्धतीतील शैली आणि बंधांनी नाकारलेली अनेक विषयांमध्ये पारंगत होण्याची संधी मिळेल. हे करताना तुम्हाला काही प्रमाणात जोखीम घ्यावी लागेल पण चिकाटी आणि संयमाच्या जोरावर तुम्ही जिंकाल. वेगळे बनण्यासाठी जोखीम जरूर घ्या, तटस्थता नको.

निष्ठेला वेठीस धरू नका

निष्ठा ही तुमच्या यशाचा पाया आहे. बरेचदा लोक निष्ठेचा अर्थ लवचीक नसलेली असा घेतात. तसे नाही. निष्ठा हे स्वत:पुरते मूल्य नसून इतर मूल्यांची खात्री देणारे मूल्य आहे.

माणसे तीन प्रकारची असतात. अयशस्वी, अर्धयशस्वी आणि यशवंत. यांमधील फरक त्यांच्या व्यक्तिमत्त्वांतून प्रतीत होतो. निष्ठावंत असणे म्हणजे केवळ योग्य गोष्टी करत राहणे इतकेच नव्हे तर गोष्टी योग्य आहेत म्हणून त्या आवर्जून करत राहणे होय.

यशवंत राहण्यासाठी आपल्याकडे सचोटी, आत्मविश्वास आणि धीर हवा. परिस्थितिवशातसुद्धा तुम्ही निष्ठांशी तडजोड करू नये. निष्ठा ही मनाची अवस्था असते ती परिस्थितिवश नसते. छोट्याशा प्रसंगात, किरकोळ परिणाम साधण्याकरिता एकदा का तुम्ही निष्ठेशी तडजोड केलीत तर तशी सवय जडते. दुर्दैवाने आज आपल्याला सर्वत्र अशी तडजोड करणारेच दिसतात.

प्रामाणिकता ही तुमची दुसर्‍यांवरची उपचारपद्धती नसून ती तुम्ही स्वत:वर उपयोजण्याची रीत आहे. प्रामाणिकतेखेरीज निष्ठेला अधिष्ठान नाही. प्रामाणिकता आणि निष्ठा मिळून विश्वास बनतो. स्वत:वरचा आणि आपल्या भोवतीच्यांवरचा विश्वास. विश्वासातून आत्मविश्वास निर्माण होतो ज्याची आपल्याला जीवनातील अनेक समस्यांवर मात करताना अगदीच गरज आहे, जो आपल्याला जीवनध्येये साध्य करण्यासाठी जोखीम स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो.

अलिकडेच मला राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने जैवविविधता कायद्याच्या भारतामधील अंमलबजावणीसंबंधी एक निर्णय घ्यायचा होता तेव्हा असे जाणवले की संस्था आणि कायदा या दोहोंच्या हिताविरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडण्यासाठी माझ्यावर आस्थापनेचा दबाव येतो आहे. निर्णय टाळण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मी संस्थेचा कार्यकारी प्रमुख. तत्त्वांशी तडजोड करावी लागण्याचा बाका प्रसंग आला तेव्हा ते पद सोडले, निष्ठा जपली. याचे काही व्यक्तिगत परिणाम अटळ होते तरी सत्य आणि संस्थेचा विश्वास यांच्याशी एकनिष्ठ राहिलो म्हणून जीवनात पश्चात्ताप कधीच झाला नाही.

एक गोष्ट येथे लक्षात ठेवा, आजकालच्या समाजामध्ये तडजोडीचे फायदे जीवनाचाच भाग असल्यासारखे दिसत असता निष्ठा अभंग ठेवणे मुश्किल आहे. पण मी आधी सांगितले ते विसरू नका, तुम्ही वेगळे असाल तर (निष्ठेसाठी) उभे ठाकाल आणि जिंकाल.

केवळ एक प्रथितयश व्यावसायिक बनण्याचे नियोजन नको, एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी नियोजन करा.

यशाच्या मार्गावर एक चांगला माणूस कसे बनावे हे कुणी आपल्या शाळा-महाविद्यालयात शिकवत नाही. प्रथितयश व्यावसायिक कसे बनावे आणि ते यश कसे टिकवावे याचे शिक्षण-प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम, उद्बोधनशाळा, व्याख्याने आणि वर्ग कदाचित जरा जास्तच चालताहेत. परंतु व्यावसायिक बनण्यासाठी आधी चांगला माणूस असणे गरजेचे आहे असे सांगणारा एकही अभ्यासक्रम आढळात नाही.

लोक जोडण्याचे कौशल्य, प्रेरकता, नेतृत्वाची आवड, यशाची आस आणि सतत शिखरावर राहण्याचा लोभ हे सारे आपल्या दैनंदिन विचारधारा नि कृतींचे उर्जास्रोत असतात. आपल्याला सतत वाटत असते की यांना साध्य करण्यासाठी आपल्याला छान, हुशार आणि तैलबुद्धी असायला हवे. परंतु अस्सल, प्रेमळ आणि जबाबदार मनुष्य व्हावेसे आपल्याला कधीतरीच वाटतं.

ऍपलचे जनक स्टीव्ह जॉब्स यांना ऍपलमधून डच्चू मिळाल्यावर स्वत:च्या मनोवस्थेचे वर्णन करताना म्हणतात, “पुन्हा नवोदित बनण्याच्या कल्पनेतील हलकेफुलकेपणाने माझ्यावरचा यशाचा भार हरला”.

आपल्यापैकी पुष्कळांना वाटत असते व्यावसायिक यश मिळवण्यासाठी आधी आपण आपल्या सहकार्‍यांशी स्पर्धा करून स्वत:ला सिद्ध केले पाहिजे. सत्ता आणि अधिकार आपल्या मनात अशी भावना निर्माण करतात की आता आपल्याला एकट्यालाच बरोबर वाटलेले निर्णयसुद्धा आपण घेऊ शकतो. सत्ता आणि अधिकार हे दोन्ही क्षणभंगुर आहेत हे आपण विसरतो. आपल्या हातातून हे दोन्ही जातात त्या क्षणाला जणु तुमचे विश्व तुमच्या डोळ्यांसमोर कोसळते. तुमच्यावर स्तुति-कौतुकांचा वर्षाव करणारे तेच ते लोक तुम्हाला टाळायला लागतात, तुमच्याकडे दुर्लक्ष करतात.

जीवन सीमित आहे. उद्याच मरणार असल्यासारखे आज जगून घ्या. दुसर्‍याच कुणाच्यातरी गरजांप्रमाणे वा जगण्याप्रमाणे जगून ते वाया घालवू नका. तुमचा अंतर्नाद तुम्हाला मार्गदर्शन करो, इतरांच्या मतांच्या गोंगाटापासून तुमची सुटका करो.

मित्रहो, हा क्षण तुमच्या जीवनातील एकमेवाद्वितीय असा आहे, पुन्हा तो तसा लाभणार नाही. आज तुमच्याकडे गमवण्यासारखे काही नाहीच. मौल्यवान असे जे जे तुम्ही मिळवले आहे ते तुमच्या स्वत:मध्ये सुरक्षित आहे. तुमच्याकडे स्वप्न असेल तर त्याच्या पूर्ततेसाठी निघण्याची हीच वेळ आहे. तुम्ही खूप भाग्यवंत आहात, तुम्हाला स्वत:ची ओळख आहे. तुमच्या साहाय्याला तुमचे पालक, कुटुंब आणि मित्र आहेत. नशीबवान आहात की तुम्ही अमेरिकेत जन्मला नाहीत, अन्यथा एव्हाना शिक्षणकर्जाचे डोंगर तुमच्या शिरावर असले असते. तुम्ही सुदैवी आहात की संधींची भूमी म्हणून आज भारताचे नवनिर्माण होत आहे. तुमच्यापैकी पुष्कळांना मोठ्या जबाबदार्‍या नसण्याचे वरदान आहे.

ही वेळ तुमच्यापैकी प्रत्येकाने विचार करण्याची आहे की दुर्दैवी, कमनशिबी असे जे मर्यादित संधींसह आशेच्या अंधुक किरणांत चाचपडताहेत त्यांच्या जीवनात इष्टपरिवर्तन आणण्यास आपण कसे कारण होऊ. उठून बसावे नि जग पाहावे इतकीही ताकद नाही त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही उठून जीवनाचा डाव मांडायला सिद्ध आहात.

तुमच्यापैकी प्रत्येकजण जीवनभरामध्ये आपल्या नातेवाईकांव्यतिरिक्त किमान पाच देशवासीयांच्या जीवनांत इष्टपरिवर्तन आणण्याची शपथ घ्याल का? हे आह्वान स्वीकारलेत तर आत्ता, या क्षणाला, या देशातील हजारो वंचितांना तुम्ही जीवेच्छा दिलेली असेल. कल्पना करा, पुढील दहा वर्षांतील या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर सर्व स्नातकांनी असा पुढाकार घेतला तर…

तीन मंत्र देऊन थांबतो –

शिकत राहा, प्रथितयश व्यावसायिकाच्या पुढे जाऊन एक उत्तम व्यक्ती म्हणून मोठे व्हा आणि जे शिकलात ते देण्यातला आनंद लुटा.

स्वप्नांचा पाठपुरावा करा, स्वत:चेच जीवन जगा. आणि

विसरू नका, दानात अभिवृद्धी आहे — जितके द्याल तितके भरभरून तुम्हाला मिळणार.

तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा!

अनुवाद : अंबुजा साळगांवकर, जयंत कीर्तने