“स्वातंत्र्य म्हणजे काय? ते इतके मोलाचे का वाटते? स्वातंत्र्याची ओढ मानवी स्वभावांत उपजतच आहे, कीं विशेष परिस्थितीमुळे घडणारा तो एक संस्कार आहे? स्वातंत्र्य हे अंतिम साध्य आहे कीं दुसरे काही संपादन करण्याचे ते एक साधन आहे – स्वातंत्र्याबरोबरच काही जबाबदाऱ्या अपरिहार्य ठरतात काय? आणि अधिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी एकादा समाजचा समाज स्वातंत्र्यावर पाणी सोडायला सहज राजी व्हावा इतक्या त्या जबाबदाऱ्या अवजड असतात काय? स्वातंत्र्यसंपादन आणि स्वातंत्र्यरक्षण यासाठी करावयाचे प्रयत्न टाळण्याकडे बहुसंख्य माणसांचा कल सहज व्हावा, इतके स्वातंत्र्यासाठी झगडणे हे सायासाचे असते काय – अन्न, वस्त्र, निवारा अथवा चैनही, यांचे म्हणजेच चरितार्थाच्या हमीचे जितके महत्व वाटते तितकेच स्वातंत्र्याचे आणि त्याच्या अनुषंगाने लाभणाऱ्या गोष्टींचे महत्त्व वाटते काय ?….

सर्व सामान्य मानवानीं स्वातंत्र्य संपादण्यासाठी केलेली धडपड हीच राजकीय इतिहासामागची प्रेरक शक्ती होय, ही समजूत खरी आहे काय? राजकीय स्वातंत्र्यासाठी खुद्द आपण (अमेरिकन लोकांनी) जो झगडा केला, त्याची प्रेरणा खऱ्या खुऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची ओढ हीच होती, की आपल्या पूर्वजांना काही गैरसोयीचा जाच वाटत होता आणि केवळ त्यातून मुक्त होण्याच्या इच्छेनेच त्यांना हा झगडा केला? त्या गैरसोयीचे जाच वाटणे याखेरीज त्या झगड्यामागे दुसरी कोणतीच समान भावना नव्हती काय? काही विशिष्ट बंधने तोडण्याची उत्कट इच्छा यापेक्षा स्वातंत्र्य प्रेमाचे आणखी काही वैशिष्ट्य आहे की नाही – आणि एकदा ही बंधने तुटली की स्वातंत्र्येच्छा विरून जाते काय? आणि पुन्हा दुसरी बंधने असह्य झाल्यावरच ती उफाळून येते काय ?…..

समाजातील अन्य घटकाशी एकात्म होणे, सुसंघटितपणाची भावना अंतःकरणात वसणे, यामुळे लाभणारी सुखमयता आणि स्वातंत्र्याची फलश्रुती यात निरस – सरस कसे ठरवायचे? – समाजाशी एकरूप झाल्याच्या भावनेतून मिळणारे समाधान, समाजाशी एकात्म होण्याने वाटणारा निर्धास्तपणा, आणि त्यामुळेच इतराकडून दिला जाणारा मान, या गोष्टी मिळण्याची जर खात्री असेल तर माणसे आपल्य वैयक्तिक स्वातंत्र्यावर तिलांजली द्यावयाला तयार होतील काय?

(जॉन डुई यांच्या फ्रीडम अँड कल्चर या पुस्तकाच्या स्वातंत्र्य आणि संस्कृती या मराठी भाषांतरातून)

(सेक्युलर व्हिजन, जाने – जून 2015 यांच्या सौजन्याने)

gautamiputrak@gmail.com”