”परधर्माच्या लोकांनी आमच्या धर्माच्या लोकांस आपल्या धर्मात घेतले म्हणजे आमच्या धर्मगुरूंची छाती दु:खाने फाटून जाते! लोकांनी धर्मातर करू नये म्हणून ते गीतेतील तत्त्वज्ञान दाखवतील, वेदांतील सुरस काव्य पुढे करतील, उपनिषदांतील गहन विषय सांगतील, पण धर्माच्या नावाखाली धर्माचाच घात करणाऱ्यांची कानउघाडणी त्यांच्या हातून होणार नाही. असे तर हे धर्ममरतड! असे तर हे धर्मगुरू! आणि असे तर हे शंकराचार्य! बसल्या बसल्या नाटकाप्रमाणे वेदांचे भाषांतर केल्याने धर्माची सुधारणा होणार नाही. गावोगाव पालखीत मिरविल्याने धर्माची ग्लानी जाणार नाही. गीतेवर कितीही लंबी प्रवचने झोडल्याने धर्म जागा होणार नाही. गणपतीचा महिनोगणती उत्सव केल्याने धर्मास जोम येणार नाही. जो धर्माचा विस्तार म्हणून मानण्यात येतो त्या बहुजन समाजास धर्माच्या खऱ्या मार्गावर लावल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे..धर्म हा समाजस्थैर्यासाठीच निर्माण झाला आहे. अर्थातच समाजाचा उत्कर्ष म्हणजे धर्म असा त्याचा अर्थ ठरतो आणि जोपर्यंत धर्माचा हा अर्थ मानला जतो, तोपर्यंत समाजाचा उत्कर्षच असतो. आज जे जे समाज अध:पतन पावले आहेत, त्या त्या समाजाच्या धर्माची प्रकृति बिघडली आहे यात शंका नाही!”

‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील