..आज प्रत्यक्ष हिंदू समाजात सर्वच प्रकारच्या भिन्नत्वाच्या कल्पना प्रभावी आहेत. जातीबद्दलची उच्चनीचत्वाची भावना आहे. पोटजातीबद्दलचा अभिमान आहे व त्याबरोबरच प्रादेशिक व भाषिक भिन्नत्वाच्या कल्पनांचा पूर्ण पगडा आहे.. जोवर प्रत्येक पंथ, जात, गट आपापले वैशिष्टय़ निराळे मानतो व त्याप्रमाणे वागतो तोवर भारतीयतेचा कितीही डांगोरा पिटला, तरी आमचा समाज अनेकविध विभागलेला आणि म्हणून दुर्बळ राहणार. तसेच राष्ट्राभिमानाचा अतिरेक व दुष्परिणाम होतात ते राष्ट्रनिष्ठा या एकाच कल्पनेस फाजील महत्त्व दिल्यामुळे.

व्यक्ती, कुटुंब, गाव, प्रदेश, राष्ट्र, खंड, जग ही एक श्रेणी मानता येईल. या श्रेणीतील प्रत्येक घटकाबाबत व्यक्तीचे विशिष्ट कर्तव्य असते. सर्वाची अधिकारक्षेत्रे प्राय: एकमेकांपासून विभिन्न, निराळी. जोवर एकाचे दुसऱ्यावर अतिक्रमण होत नाही तोवर एकमेकांत विरोध उत्पन्न होण्याचे काही कारण नाही. यांतील कोणत्याही एकाचे स्थान इतरांहून विशेष श्रेष्ठ व निष्ठा बाळगावयाची ती त्या बाबतचीच असे म्हटल्याने अतिरेक होतो व बेबंदशाही अगर हुकूमशाही, अराजक किंवा केवळ दंडनीती या कुठल्यातरी टोकाकडे समाज साहजिकच झुकतो. गाव व प्रदेश यांनी राष्ट्रास न मानले तर बेबंदशाही माजेल. उलट राष्ट्राभिमान, देशाची एकता या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी राष्ट्राच्या सरकारने कुटुंब, गाव अगर प्रदेश यांच्या योग्य हक्कांवर अतिक्रमण केले, यांपैकी कोणास अन्यायाने वागविले तर ते, गाव-प्रदेशाहून राष्ट्र मोठे, म्हणून निमूटपणे सहन केले पाहिजे असे नाही; किंबहुना समाजाचा समतोल राखण्याकरिता अशा अतिक्रमणाचा योग्य प्रकारे प्रतिकार करणे हे कर्तव्यच ठरते. असला प्रतिकार कोतेपणाचे लक्षण नसून खऱ्या अर्थाने राष्ट्रहित साधणाराच आहे.

ध. रा. गाडगीळ