धर्मनिरपेक्ष शासन हा लोकशाहीचा पाया आहे. भारतातील आजचे बहुसंख्य पक्षही धर्मनिरपेक्ष शासन व लोकशाही ही मूल्ये मानणारे आहेत. पण आपापसातील तंट्यांमुळे काँग्रेस पक्ष सध्या विघटित झाला आहे. सोवियत युनियनच्या विघटनानंतर मार्क्सवादी पक्ष हतबल झालेल आहेत आणि लोकशाही समाजवादी पक्ष संपुष्टात आले आहेत. त्यामुळे सामाजिक व राजकीय प्रश्नांवर लोकांचे प्रबोधन करणाऱ्या संघटना अभावाने आढळतात. जमातवादाच्या यशाचे हे खरे कारण आहे. हिंदू धर्म हा जातिश्रेष्ठतेच्या कल्पनेवर आधारलेला असल्यामुळे तो लोकशाहीच्या मार्गातील एक मोठा अडसर आहे हे तर खरेच, पण त्याच कारणामुळे हिटलरसाऱखी ठोकशाहीवर आधारलेली संघटना स्थापन करणेही हिंदुत्ववाद्यांना अवघड आहे. पण त्यामुळे गाफिल राहून चालणार नाही. म्हणून धर्मनिरपेक्ष शासन व लोकशाही या मूल्यांवर ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मध्ययुगीन मूल्यांना व जातीय उच्च – नीचभावाला विरोध करून जरूर त्या सामाजिक सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत आणि निरनिराळ्या प्रकारच्या संघटना काढून हुकुमशाहीला विरोध करण्यासाठी लोकमत तयार केले पाहिजे. भारतात लोकशाही टिकवून धरण्याचा तोच एक मार्ग आहे.

नलिनी पंडित

(धर्म, शासन आणि समाज या पुस्तकातून)