आत्मा आणि मानवी मेंदू

लेखक - य. ना. वालावलकर

इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्य: परं मन:। मनसस्तु परा बुद्धि: यो बुद्धे: परतस्तु स:।
(गीता अ. ३ श्लोक. ४२)
गीतेतील या श्लोकात इंद्रिये (ज्ञानेंद्रिये+कर्मेंद्रिये), मन आणि बुद्धी यांचा उल्लेख आहे. मात्र बुद्धीचे तसेच मनाचेही अधिष्ठान असलेल्या मेंदूचा उल्लेख नाही. संपूर्ण गीतेत मेंदू अथवा त्या अर्थाचा अन्य कोणताही शब्द नाही. संस्कृत-मराठी “गीर्वाणलघुकोशा”त मेंदू हा शब्द नाही. पुढे शोध घेता लक्षात आले की आपण आज ज्या अर्थाने मेंदू हा शब्द वापरतो त्या अर्थाचा एकही शब्द वेद, उपनिषदे, गीता यांत नाही. एवढेच नव्हे तर तो बायबलात नाही, कुराणात नाही, कुठल्याही धर्मग्रंथात नाही. ज्ञानेश्वरीत नाही, अन्य संतसाहित्यात नाही. मेंदूच्या कार्याविषयीं माणसाला झालेले ज्ञान अगदी अलिकडचे म्हणजे गेल्या दोन शतकांतील आहे.
याचा अर्थ असा नव्हे की डोक्याच्या कवटीत सुरक्षितपणे असलेला मेंदू हा अवयव प्राचीनकाळी ठाऊक नव्हता. यज्ञात अनेक पशू बळी देत. तसेच मांसाहारासाठी बोकड, बैल, गाय असे पशू कापीत. तेव्हा पशूंचे सर्व अवयव वेदकालीन माणसाला ज्ञात होते. हाडात जसा पांढरा-पिवळा मगज असतो तसा प्राण्यांच्या डोक्याच्या कवटीत फिकट गुलाबी-राखी रंगाचा मगज असतो. माणसाच्या डोक्यातही तसा असणार एवढे त्याकाळी कळत होते. पण त्याच्या कार्याविषयी काहीच कल्पना माणसाला नव्हती. शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करण्याची यंत्रणा त्या गुलबट रंगाच्या मगजात आहे याची कल्पना त्याकाळी जगात कुणालाच नव्हती. ते ज्ञान अगदी अलिकडचे आहे. माणसाच्या स्मृती, ज्ञान, मन, बुद्धी यांचे स्थान हृदयात आहे अशी पूर्वी सर्वांची समजूत होती. कारण हृदयाची धडधड कळत होती. ती थांबली की मृत्यू येतो हे दिसत होते.
माणसाची कर्मेंद्रिये कोणती, ज्ञानेंद्रिये कोणती, प्रत्येक इंद्रियाचे काम काय हे सहज समजत होते. पण इंद्रियांनी आपापली कामे करावी म्हणून त्यांना कोण प्रवृत्त करतो? ज्ञानेंद्रियांद्वारे झालेले ज्ञान नेमके कोणाला होते? ज्ञाता कोण? हे समजत नव्हते. डोळ्यांनी एक वस्तु पाहिली. ती सोनचाफ्याची कळी आहे हे आपल्याला समजले. वस्तूचे रूप आणि नाव यांची सांगड घातलेली ही स्मृती शरीरात कुठे साठविलेली असते? एक आवाज कानांनी ऐकला. त्यावरून सापाने तोंडात बेडूक पकडला आहे हे हे पूर्वानुभवामुळे कळले. नाकाद्वारे सुगंध आला. बकुळीच्या फुलांची आठवण झाली. हे सगळे कसे घडते? कोण घडवते?
केनोपनिषदात शिष्य गुरूंना विचारतोः
लोक ज्या वाणीने बोलतात त्या वाणीला बोलण्यास कोण प्रवृत्त करतो? डोळ्यांना आणि कानांना त्या त्या कामासाठी कोण नियुक्त करतो?
ऐतरेय उपनिषदात आहे:–
ज्याच्यामुळे माणूस (नेत्रांद्वारे) पाहातो, (कर्णाद्वारे) ऐकतो, (नाकाद्वारे) वास घेतो, वाचेद्वारे स्पष्ट बोलतो, (रसनेद्वारे) चविष्ट-बेचव जाणतो तो आत्मा कोण आहे?
या प्रश्नाचे उत्तर, “तो हृदयस्थ आत्मा परमात्म्याचा अंश आहे.” असे तिथे दिले आहे. (उपनिषदातील या प्रश्नाचे खरे उत्तर आत्मा असे नसून निश्चितपणे मेंदू असे आहे हे आपण आज जाणतो.)
त्याच उपनिषदात पुढे,
संज्ञानं (सम्यक ज्ञान), आज्ञानं (आदेश देण्याची शक्ती),विज्ञानं (विभिन्न रूपांवरून वस्तू ओळखण्याची क्षमता), प्रज्ञानं (तात्काळ जाणण्याची शक्ती), मेधा, दृष्टि, धृति:, मति:, मनीषा(मनन करण्याची शक्ती), स्मृति:, संकल्प:, क्रतु:(मनोरथ शक्ती), असु:(प्राणशक्ती) , काम: एतानि सर्वाणि प्रज्ञानस्य एव(जीवात्म्याचीच) नामधेयानि।(नावे आहेत.)
अशी प्रश्नोत्तरे उद्भवण्याचे कारण म्हणजे मेंदूच्या कार्याविषयीं असलेली त्या काळच्या माणसाची अनभिज्ञता. अन्य सर्व इंद्रियांची कामे कोणती ते स्पष्टपणे कळत होते. जसे डोळ्यांचे कार्य पाहाणे, कानांचे काम ऐकणे, नाकाचे वास घेणे हे सहज समजते. पण डोक्याच्या कवटीत आहे ते काय? त्याचे कार्य कोणते? याची काहीच कल्पना नव्हती. ज्यात शंभर अब्ज मज्जा पेशी आहेत असा माणसाचा मेंदू म्हणजे जगातले सर्वांत विस्मयकारक, व्यामिश्र (गुंतागुंतीचे), समजण्यास गहनतम असे विद्युत् -रासायनिक यंत्र आहे. माणसाच्या शारीरिक, वैचारिक, मानसिक, भावनिक अशा सर्व कृतींचे नियंत्रण मेंदू करतो. हे गेल्या शंभर- दिडशे वर्षांत समजले आहे. उपनिषद् काळात मेंदू विषयीचे हे कोणतेच ज्ञान नसणे स्वाभाविक आहे.
पण माणसाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्याला हवी असतात. शिष्यांनी विचारलेल्या अशा प्रश्नांवर गुरू चिंतन करतात. इंद्रिये आपापली कामे करतात त्यासाठी त्यांना कोण प्रवृत्त करतो? कोण आज्ञा देतो? इंद्रिये, मन, बुद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवणारा कोणीतरी शरीरात असला पाहिजे असे त्यांना वाटत होते. वस्तूचे नाव आणि तिचे रूप-गंधादि गुणधर्म यांची सांगड घालून ती स्मृती शरीरात कुठे, कशी नोंदविलेली असते? सर्वव्यापी ब्रह्मापासून विश्वाची निर्मिती झाली हे सर्व उपनिषद्कार मानत होते. त्या ब्रह्माचा अंश माणसाच्या शरीरात असणार हे स्वाभाविकपणे तर्कसंगत वाटले असावे. म्हणून त्यांनी तशी कल्पना केली. शरीरांतील त्या मानीव ब्रह्मांशाला आत्मा असे नाव दिले. सर्वव्यापी ब्रह्म आणि शरीरस्थ ब्रह्म यांतील भेद स्पष्ट होण्याकरिता सर्वव्यापीसाठी परब्रह्म, परमात्मा, परमपुरुष, शिवात्मा तर शरीरस्थासाठी ब्रह्म, आत्मा, जीवात्मा, अंतरात्मा, देही असे शब्द रूढ झाले. हा आत्मा हृदयात असतो हेही सर्वमान्य झाले.
अंगठ्याएवढा असलेला अंतरात्मा पुरुष नेहमी माणसाच्या हृदयात स्थित असतो.मी सर्वांच्या हृदयात सामावलो आहे. स्मृती, ज्ञान, चिकित्सक वृत्ती, चर्चा करून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची क्षमता(अपोहन), यांचा उद्भव माझ्यातून आहे.
(अ.१५,श्लोक.१५)
गीतेतील या श्लोकात उल्लेख असलेल्या स्मृती, ज्ञान आणि चिकित्सक वृत्ती या तीनही गोष्टी मेंदूत उद्भवतात हे आज आपण निर्विवादपणे जाणतो. यावरून आजच्या मेंदूला प्राचीन काळचे ऋषी आत्मा मानीत होते असे दिसते.
हा जीवात्मा कान, डोळे, स्पर्शेन्द्रिय -त्वचा-, जिव्हा आणि घ्राणेंद्रिय –नाक – तसेच अंत:करण ह्यांच्या आश्रयाने (द्वारें) विषयांचा उपभोग घेतो.
(गीता अ.१५,श्लोक.९)
अन्नाच्या पचनासाठी लागणार्‍या सर्व क्रिया मेंदू नियंत्रित करतो. कोणते पाचकरस केव्हा स्रवावे याचे आदेश मेंदू देतो.
(गीता अ.१५,श्लो.१४)
यावरून गीतेतील अहं (श्रीकृष्ण) म्हणजे मेंदूच असावा हे स्पष्ट आहे.
प्रश्नोपनिषदात गार्ग्य मुनींनी विचारलेल्या प्रश्नाला महर्षी पिप्पलाद यांनी दिलेल्या उत्तरामधूनही ही संकल्पना स्पष्ट होते.
हा जो पाहाणारा, स्पर्श करणारा, ऐकणारा, हुंगणारा, तसेच (इंद्रियांद्वारे) कार्य करणारा विज्ञानात्मा, जीवात्मा आहे , तो अविनाशी अशा परमात्म्यात स्थित आहे. आज आपल्याला निश्चितपणे ठावूक आहे की हे सर्व करणारा मेंदू आहे.
हे गार्ग्य ! अस्ताला जाणार्‍या सूर्याची सर्व किरणे जशी त्याच्या तेजोमंडलाच्या ठिकाणी एकवटतात आणि सूर्योदय झाल्यावर ती सूर्यबिंबातून पुन्हा फाकतात.
यावरून उपनिषद् काळातील ज्ञानमर्यादा समजते.
(झोपेत असताना माणसाचा) तो सर्व ज्ञानेंद्रियसमुदाय मनाच्याठिकाणी विलीन होतो. त्यामुळे हा जीवात्मा कांही ऐकत नाही. पाहात नाही. कशाचा वास घेत नाही. स्वाद घेत नाही. त्याला स्पर्श जाणवत नाही. अशावेळी तो झोपला आहे असे लोक म्हणतात.
या स्वप्नावस्थेत हा जीवात्मा आपल्या विभूतीचा (सर्वव्यापीपणाचा, सर्वसाक्षीपणाचा) अनुभव घेतो. जे अनेकदा पाहिले आहे ते पुन:पुन्हा पाहातो. जे अनेकदा ऐकले आहे ते पुनश्च ऐकतो. नाना देशांतील आणि अष्टदिशांतील अनुभवलेल्या विषयांचा पुन:प्रत्यय घेतो. इतकेच नव्हे तर पाहिलेले आणि न पाहिलेले, ऐकलेले आणि कधीही न ऐकलेले , अनुभवलेले आणि कधीही न अनुभवलेले, अस्तित्वात असलेले तसेच अस्तित्वात नसलेलेसुद्धा स्वप्नात पाहातो. म्हणजे (निजल्याजागी) आपणच सर्व होतो आणि आपणच पाहातो.
आज आपण जाणतो की स्वप्नावस्थेतील आत्म्याचे हे वर्णन मानवी मेंदूला शत-प्रतिशत (१००%) लागू पडते. त्याकाळी उपनिषद् कारांनी स्वप्नांचा किती सूक्ष्म आणि सखोल अभ्यास केला होता हे लक्षात येते. खरे तर तो विचार त्यांच्या मेंदूनेच केला. पण स्वप्ने पाहाणारा हृदयस्थ आत्मा नसून मी मेंदू म्हणजे तुमच्या डोक्याच्या कवटीत असलेला गुलबट रंगाचा मगज आहे याची जाणीव त्यांना होऊ दिली नाही. त्याकाळी ते समजणे शक्यही नव्हते. आता साडेतीन सहस्र वर्षांनंतर त्यांच्या वंशजांना (म्हणजे आपल्याला) ते समजले.
* * *
असे हे उल्लेख उपनिषदांत तसेच गीतेत आहेत. इथे हृदय हे स्थान सोडून अन्य बहुतेक गोष्टी मेंदूला लागू पडतात हे आपल्याला आज समजते.
पुढे या काल्पनिक आत्म्याच्या पायावर पुनर्जन्म, संचित, प्रारब्ध, स्वर्ग, आत्म्याचा अर्चिरादि मार्गांनी प्रवास, मोक्ष, मोक्षप्राप्तीचे विविध मार्ग, जन्ममृत्यूचे फेरे, चौर्‍याऐशी लक्ष योनी अशा अनेकानेक भ्रामक संकल्पनांचे बहुमजली डोलारे उभे राहिले. वस्तुत: हे सगळे माणसाच्या मेंदूनेच निर्माण केले.”तुम्ही ज्याला शोधत आहात तो कर्ता-करविता मी आहे.” याचा थांगपत्ता त्याने दीर्घकाळ लागू दिला नाही. त्याच्या आज्ञेनेच तर सगळे घडत होते. पण ते त्याचे त्यालाच ठाऊक नव्हते. मग थांगपत्ता कोण, कोणाला, कसा सांगणार?
“आत्मा वा अरे द्रष्टव्य:,श्रोतव्य:,मन्तव्य:, निदिध्यासितव्य:।
(बृहदारण्यक उपनिषद)
अरे बाबांनो! आत्मा म्हणजे काय ते पाहायला हवे. त्याविषयी ऐकायला हवे. त्यावर मनन, चिंतन करायला हवे. आत्म्याचा सतत ध्यास घ्यायला हवा. तरच आत्मा म्हणजे काय ते थोडे-फार समजेल .
जणूं या औपनिषदिक उपदेशानुसार आधुनिक वैज्ञानिकांनी मेंदूविषयी सतत संशोधन केले आणि मेंदुविज्ञानात मोठी प्रगती झाली. आज जगभरात सर्वाधिक संशोधन मेंदू या विषयावर होत आहे. मानवी मेंदू म्हणजेच उपनिषदांतील आत्मा हे आता समजू लागले आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा.
अशी आहे ही जाणिवेची जाणीव असलेल्या (पण बरेचदा कुठल्या कुठे भरकटणार्‍या) होमो सेपियन सेपियनची गंम्मत! म्हणजे अब्जावधी मज्जापेशींनी बनलेल्या त्याच्या मेंदूची मज्जा!

ynwala@gmail.com