संस्थापक परीचय

बुद्धिप्रामाण्यवादी तत्वाचिंतक प्रा. दि. य. देशपांडे

महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळींना आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासकांना नेहमीच मार्गदर्शनासाठी लाभलले प्रा. दि. य. देशपांडे साऱ्यांनाच दि.य. म्हणून परिचित होते. देशपांडे कुटुंबीय तत्वज्ञानाला वाहिलेले म्हणूनही सर्वपरिचित होते. त्यांच्या पत्नी प्रा. म.ग. नातू आणि दि.य. यांचे आगरकर वाङ्‌मयाच्या 3 खंडांच्या निर्मितीचे योगदानही सर्वमान्य झालेले होते. सेवानिवृत्तीनंतर 1978पासून त्यांचे वास्तव्य नागपुरात होते. त्यांच्या मागे वहिनी प्रा. सुनीती देव व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
नागपूरच्या मॉरेस कॉलेजमधून बी.ए.ला प्रथम आल्याबद्दल रॉर्बटसन सुवर्णपदक तर एम.ए.ला तत्वज्ञानात सर ऑर्थर ब्लेनर हॅसेट रौप्य पदक त्यांनी पटकाविले होते. यानंतर 1941-43 दरम्यान अमळनेरच्या भारतीय तत्वज्ञान संस्थेत ते संशोधक म्हणून होते. सांगलीचे विलिंग्टन महाविद्यालय व जबलपूरच्या रॉर्बटसन महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्य केल्यानंतर अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयातून प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. 1989 मध्ये स्थापन केलेल्या नागपूरला इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशनचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेसच्या पुणे येथील अधिवेशनाचे तर दिल्ली येथील सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाचेही ते विभागीय अध्यक्ष होते. नागपूर विद्यापीठात सांकेतिक तर्कशास्त्र हा विषय सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

द ट्रूथ अबाउट गॉड, एथिक्स फॉर एव्हरीमॅन, वुमेन, फॅमिली अॅड सोशालिझम, देकार्त: चिंतने अशी डझनावरी त्यांची पुस्तके प्रसिद्धी होती. देशभरातील तत्वज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकांमधून त्यांचे अनेक निबंध प्रसिद्ध झाले होते.

बुद्धिप्रामाण्यवादी तत्वाचिंतक आणि तत्त्वाचिंतनाला वाहिलेल्या `आजचा सुधारक`चे संस्थापक-संपादक प्रा. दि.य. देशपांडे यांचे 31 डिसेंबर 2005 सुमारास निधन झाले.

अधिक माहितीसाठी   जगावेगळे

                                 परामर्श (फेब्रुवरी 2006)